आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्म, प्रांत अन् भाषेच्या जोरावर देशाचे तुकडे करण्याचा डाव; कन्हैयाकुमारची सरकारवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- संविधान बचाओ लाँग मार्चच्या निमित्ताने बीडमध्ये रोहित अॅक्ट परिषदेत विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारने चौफेर फटकेबाजी करत सरकारवर जोरदार टीका केली.आशीर्वाद लॉन्समध्ये झालेल्या या सभेला नागरिकांची विशेषत: विद्यार्थ्यांची माेठी उपस्थिती होती. हिंदीतून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना शिक्षण, बेरोजगारी, गोरक्षकांकडून होणारे अत्याचार, आदिवासींचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेशदौरे या सगळ्यांचा ऊहापोह करत सरकारला धारेवर धरले. कन्हैयाकुमारचे भाषण त्याच्याच  शब्दांत. 

जे सरकार बेपत्ता झालेल्या नजीबला अद्याप शोधू शकलेलं नाही ते सरकार काळं धन काय शोधणार.  धर्म, प्रांत आणि भाषेच्या मुद्यावर देशाचे तुकडे करण्याचा धर्मवाद्यांचा डाव आहे. नरेंद्र मोदी हे थापाडे पंतप्रधान आहे. मोदींचा विरोध हा व्यक्तीद्वेष नाही तर विचारधारेला विरोध आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्याची भूमी ही निजाम आाणि इंग्रजांना पळवून लावणारी भूमी आहे. सध्या देशावर संकट आहे लोकांना काय चांगलं काय वाईट हे कळायला हवं. महाराष्ट्रातला भगवा हा संत तुकाराम, संभाजी महाराज यांचा आहे. हाच भगवा बुद्धांचे अहिंसा तत्त्व शिकवतो. परंतु, संघाचा रक्तपात घडवणारा भगवा आहे. लोकांना संत तुकारामांचा भगवा हवा आहे की संघाच्या योगींचा याचा विचार करण्याची वेळ आली आहे. 

इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत असून ही भूमी सावरकरांची जितकी आहे तितकीच डॉ. आंबेडकरांचीही आहे. हिंदू आणि हिंदुत्ववादी यातला फरकही कळणे गरजेचे आहे. धर्म, जातीचा उपयोग राजकारणासाठी होतोय.  अच्छे दिनचे पोकळ आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने अद्यापही अच्छे दिन आणले नाहीत. आज प्रत्येकाने मौन सोडून व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे. दलित, आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाबाबत बोलले जात नाही. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली जात आहे. संविधान बदलून मनुस्म़ृती लादण्याचा प्रयत्न होत असल्याने ही रॅली काढण्यात आली.  

डॉलर- रुपयाऐवजी सफरचंद -टोमॅटो बरोबरीत  
मोदी परदेश दौऱ्यात व्यग्र आहेत. डॉलर आणि रुपया बरोबरीत आणण्याऐवजी देशात सफरचंद आणि टोमॅटो बरोबरीत आले आहेत. ‘मन की बात’ करणाऱ्या मोदींनी आमच्या ‘दिल की बात’ पण ऐकावी. देश अदानी, अंबानीला विकायला काढला आहे.

हे राम म्हणणाऱ्यांचा पराभव, नथुरामच्या चेल्यांचा विजय   
हे राम म्हणणाऱ्या महात्मा गांधीच्या वंशजांचा उपराष्ट्रपती निवडणुकीत पराभव झाला. मात्र नथुरामाचे गोडवे गाणाऱ्यांचा  विजय झाला.
बातम्या आणखी आहेत...