आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Meet Jalna's Kasturba Gandhai Girl's High School

बेबो म्हणाली, प्रॉमिस करा, अर्ध्यावर शाळा सोडणार नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असल्याने मी 12 वीनंतर शाळा सोडली. मात्र तुम्ही खूप शिका आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे मला प्रॉमिस करा. ज्या मुली येथे आल्या नाहीत, त्यांच्याकडूनही हे प्रॉमिस घ्या, असा प्रेमाचा सल्ला देत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री करिना कपूरने (बेबो) जालन्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींशी सोमवारी संवाद साधला. दोन तासांच्या या भेटीत करिनाने या मुलींसोबत शेरोशायरी, नृत्य, गायन आणि विविध खेळ खेळत धम्माल उडवून दिली.
युनिसेफच्या वतीने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी जालना जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी विद्यालयातील मुलींसाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात 21 मुली सहभागी झाल्या होत्या. वांद्रे येथील खासगी शाळेत झालेल्या कार्यक्रमास करिना दुपारी 2 वाजता पोहोचली. आल्याबरोबर तिने प्रत्येक मुलीची ओळख करून मुलींना स्वत:बाबत काय वाटते, हे जाणून घेतले. विविध प्रकारचे खेळ, नृत्य, शेरोशायरी, गायन सादर करताना मुलींनी धम्माल केली. राणी राठोडने करिनावर शायरी सादर केली. बदनापूरच्या कोमल मोरेने करिनाचे सुंदर चित्र काढले. करिना ते सोबत घेऊन गेली. रेश्मा अग्रवाल यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाधिकारी अर्चना जोशी, माधवी इंगळे, जिल्हा समन्वयक नूतन मघाडे यांनी नियोजन केले.

विद्याथिनींच्या प्रश्नावर दिली दिलखुलास उत्तरे
सौंदर्याचे रहस्य काय, अभिनय कुठे शिकली, 12 वीनंतर शाळा का सोडली, या मुलींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना करिनाने तेवढ्याच दिलखुलासपणे उत्तरे दिली. बहीण करिश्मासोबत नेहमीच शूटिंगच्या सेटवर जात होते, असेही ती म्हणाली.

...अन् करिनाच्या डोळ्यांत अश्रू तरळले
तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि दु:खाचा क्षण कोणता असे करिनाने मुलींना विचारले. वडील मद्यप्राशन करून आल्यानंतर आईला मारतात तो आणि ज्या दिवशी शाळा सोडावी लागली तो क्षण सर्वात दु:खाचा होता, असे आठवीच्या शीतल खरातने सांगितले तेव्हा करिनाच्या डोळ्यांत अश्रू तरळले व तिने शीतलला प्रेमाने जवळ घेतले.