आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवहारातील वादातून झाला कटारियांचा खून, आठ अटकेत; मारेकऱ्यांची ओळख पटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - शहरातील प्लॉटिंग व्यावसायिक नितीन कटारिया हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून स्थानिक गुन्हे शाखेचे दोन, तर सदर बाजार पोलिस ठाण्याचे एक पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहे.  गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दहापैकी ८ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असूून पाच आरोपींना २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. देवाण-घेवाणीच्या व्यवहारातून कटारियांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  
 
नितीन कटारियांची मंगळवारी त्यांच्या घरामसोरच धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती.  त्यांचे वडील ताराचंद कटारियांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात १० संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील चंदू धन्नू धोचीवाले, अब्दुल रहिम सत्तार खान ऊर्फ सादिक खान, शकील बुऱ्हान धोचीवाले, अफजल लब्बू मुन्नीवाले, कासनबाई या पाच आरोपींना पोलिसांनी मंगळवारीच अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मारेकऱ्याची ओळख पटवून त्यास अटक करणे, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व धारदार शस्त्र जप्त करणे यासाठी आरोपींकडून काही माहिती मिळवायची असल्याने पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती. शिवाय आणखी ३ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कटारियांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजवरून मारेकऱ्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.  फुटेजमध्ये दिसणारा आरोपी व अन्य एक संशयित सुनील खरे या दोघांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन आणि सदर बाजार पोलिस ठाण्याचे एक पथक रवाना करण्यात आले आहे.  मारेकरी नितीन कटारियांच्या ओळखीतील असल्याचे सांगितले जात अाहे.  
 
मंत्री अर्जुन खोतकर यांनी घेतली बैठक  
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे व पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्यासोबत  जिल्ह्यातील गुन्ह्यांचा व तपासाचा आढावा घेतला. गोविंद गगराणींच्या हत्येनंतर हे प्रकरण घडल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 
 
आयजींनी घेतली भेट  
बुधवारी सकाळीच औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी जालना येथे येऊन या घटनेच्या तपासाची माहिती घेतली.  प्रकरणाचा वेगाने तपास करण्यासंदर्भात त्यांनी पोलिसांना सूचना केल्या. पोलिस अधीक्षक पोकळे यांनी त्यांना तपासासंदर्भात माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...