आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचाराला लोकप्रतिनिधींचे पाठबळ - कौतिकराव ठाले पाटील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - समाजाचा समतोल ढासळत चाललेला आहे. पुरुषांतील विकृती नष्ट होण्याची गरज आहे; परंतु लैंगिक अत्याचार प्रकरणांत सरपंचांपासून मंत्र्यांपर्यंतच्या लोकप्रतिनिधींकडून पाठबळ दिले जाते, असा आरोप मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केला.

चौथ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते झाले. या वेळी ठाले म्हणाले, जो समाज स्त्रियांच्या आत्मसन्मानाचे, प्रतिष्ठेचे, माणूस असण्याचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही, तो समाज निंद्यच म्हटला पाहिजे. स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रश्न खरे तर स्त्रियांचे नाहीतच. ते पुरुषांमधील विकृतीचे आहेत. शासन यंत्रणांनी समाजाला व समाजाने शासन यंत्रणांना साथ द्यावी. यंत्रणांनी लाभ, लोभाला बळी पडू नये. अत्याचार्‍यांना पाठबळ पुरवू नये. परंतु, दुर्दैवाने पोलिस, काही प्रकरणांत न्याय यंत्रणा व सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत अनेक प्रकरणांमध्ये लोकप्रतिनिधींकडून अत्याचार्‍यांना बळ दिले जाते. हा विकृतीचाच भाग आहे.

स्त्रियाही दूषणे देतात

दुर्दैवाची बाब म्हणजे सत्तेत असलेल्या किंवा विशिष्ट राजकीय पक्षांचे काम करणार्‍या स्त्रियाही केवळली राजकीय सोय पाहून अत्याचारित स्त्रियांना दूषणे देतात. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. त्या त्या राजकीय पक्षांनी हे आवरण्याची गरज आहे. अत्याचाराचे चित्र मराठीत किती लेखिकांनी मांडले? मराठवाड्यातील उमेदीच्या लेखिकांनी अशा प्रकरणांच्या मुळापर्यंत जाऊन कारणे शोधून अभ्यास केला पाहिजे, असे ठाले यांनी म्हटले आहे.

स्त्रीवादाच्या नावाखाली.. - स्त्रीवादाच्या नावाखाली आमच्या माथी मारलं जाणारं लेखन हे कितपत स्त्रीवादी आहे? युरोप, अमेरिकेतून आयात केलेला स्त्रीवाद मराठीतील किती लेखिकांनी समजून घेतला आहे? स्त्रीवादाचं कितपत चित्रण मराठी साहित्यात झालेलं आहे, यावर संमेलनात चर्चा अपेक्षित असल्याचेही ठाले पाटील म्हणाले.