आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलासरावांना विरोध केलेल्या कव्हेकरांना नाकारले, विलासराव देशमुख समर्थकांची अद्यापही पकड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर-कृषीउत्पन्न बाजार समितीच्या निकालाने लातूरच्या राजकीय क्षेत्रातील अनेक बाबींचा निकाल लावला आहे. या निवडणुकीने आमदार अमित देशमुखांची लातूरच्या राजकीय क्षेत्रात किती पत शिल्लक आहे हे दाखवतानाच त्यांच्या राजकीय विरोधकांची पातळी उंचावल्याचेही स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर कधीकाळी विलासरावांना पराभूत केल्याच्या इतिहासात रममाण असलेल्या माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनाही देशमुख समर्थकांनी त्यांची जागा दाखवून जणू विलासरावांच्या पराभवाचे उट्टे काढले आहे.

लातूरचे राजकारण आणि अर्थकारण जिथून चालते त्या बाजार समितीची निवडणूक दोन दिवसांपूर्वी पार पडली. संचालकांच्या १८ पैकी १४ जागांचे निकाल लागले असून उर्वरित चार जागांचे निकाल न्यायालयाच्या निर्णयानंतर जाहीर होणार आहेत. जाहीर झालेल्या १४ पैकी पाच जागा भाजपने, तर नऊ जागा काँग्रेसने जिंकल्या. मात्र, जिथे सर्वच्या सर्व जागा निवडून यायच्या तिथे काँग्रेसच्या पाच जणांचा पराभव होणे हे बाजारातील वारे उलट्या दिशेने फिरू लागल्याचे द्योतक आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या प्रचारात आमच्या पॅनलचे काय होणार हा विषय नाही, तर सभापती कोण होणार? हाच एकमेव मुद्दा असल्याचे सांगणारे आमदार अमित देशमुख आता आत्मपरीक्षण करणार असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे भाजप नेते रमेश कराड यांची राजकीय उंची वाढल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे. शंभरावर सोसायट्या ताब्यात असूनही या मतदारसंघातून भाजपचे लोक निवडून येतात ही बाब देशमुखांसाठी गंभीर आहे. सरसकट सर्वांनाच गृहीत धरणे आणि लातूरपेक्षा मुंबईत जास्त रमणे या अमित देशमुखांच्या धोरणाचा लाभ भाजपने उठवला. तसेच कधीकाळी विलासरावांचा पराभव करणाऱ्या आणि वीस वर्षे याच भांडवलावर राजकारण करणाऱ्या शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यासमोर नांगी टाकण्याचे अमित देशमुखांचे धोरण विलासरावांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना पचनी पडत नव्हते. खरे तर विधानसभेच्या अगोदर ही बाब दिलीपराव देशमुखांनी ओळखली होती आणि कव्हेकरांना याबाबत जाहीरपणे सुनावले होते. त्या वेळी देशमुख समर्थक कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष विरण्याच्या आतच अमित देशमुखांच्या पुढाकाराने कव्हेकरांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले. हा प्रकार विलासरावांच्या कट्टर कार्यकर्त्यांना रुचला नव्हता. त्यातच बाजार समिती निवडणुकीत शिवाजीराव कव्हेकरांनी स्वत:सह आपल्या समर्थकांची नावे पुढे केली. अमित देशमुखांनी त्यांचे ऐकत त्यांना उमेदवाऱ्याही दिल्या. हा प्रकार आवडल्याने विलासरावांना दैवत मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी मतदानादिवशी हा राग मतपेटीतून व्यक्त केला. हा राग केवळ कव्हेकरांवरच नाही, तर त्यांची गळाभेट घेणाऱ्या अमित देशमुखांविरोधातही आहे. त्याचबरोबर माजी मंत्री दिलीपराव देशमुख या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले नाहीत, त्याचाही फटका बसला.

कव्हेकरांचे पानिपत
लातूरतालुक्यात देशमुखांना मानणारा जसा एक वर्ग आहे तसाच त्यांना कट्टरपणे विरोध करणाराही एक वर्ग आहे. त्या वर्गाला देशमुखांचे एकतर्फी राजकारण कधीच मान्य झालेले नाही. त्यामुळे देशमुखांसमोर झुकणारा नेता म्हणून या वर्गाने कव्हेकरांना जवळ केले होते. मात्र, मधल्या काळात बेरजेचे राजकारण करताना कव्हेकरांनी देशमुखांशी सलगी केली. विलासरावांचा पराभव करणारे कव्हेकर त्यांचे चिरंजीव असलेल्या अमित देशमुखांचे नेतृत्व मान्य करत असल्याचे पाहणे या वर्गाला सहन झाले नाही. त्यामुळे या वर्गाचा पाठिंबाही त्यांनी गमावला आणि कट्टर देशमुखांचे समर्थन त्यांना मिळणे शक्यच नव्हते. त्यामुळे कव्हेकरांच्या हातून तेल, तूप दोन्ही गेले आणि हाती धुपाटणे आले.
विश्लेषण