आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता केज-अंबाजोगाई येणार रेल्वेच्या नकाशावर; सर्व्हे सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज- जिल्ह्यातील अंबाजोगाई-केज-नेकनूर- मांजरसुंबा या भागातील ग्रामस्थांना गावातून रेल्वे धावताना पाहावयास मिळणार असून घाटनांदूर-श्रीगोंदा या नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण दीपावलीच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे.

जिल्ह्याच्या तत्कालीन खासदार केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने नगर- बीड-परळी या नियोजित रेल्वेमार्गाची मागणी पूर्ण झाली. मात्र, हा रेल्वेमार्ग प्रवासी अधिभार नसतानाही परळी- तेलगाव-माजलगाव-बीड-अहमदनगर असा वळवण्यात आला. त्यामुळे अंबाजोगाई-केज-नेकनूर- या गावावरून रेल्वे जाण्याची आशा संपलीच होती.

राज्य सरकारने यंदा रेल्वे बजेट जाहीर करताना घाटनांदूर-श्रीगोंदा हा नवीन रेल्वेमार्ग जाहीर करत सर्वेक्षणासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ३४ लाख रुपयांची तरतूद जाहीर केली होती. बजेट जाहीर होऊन आठ महिने होताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर रेल्वेस्थानकापासून या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असून अंबाजोगाई शहरालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे स्टोन मार्किंग करण्यात आले आहे. नियोजित रेल्वेमार्ग घाटनांदूर-अंबाजोगाई-केज-मांजरसुंबा-जामखेड-श्रीगोंदा रोड असा राहणार असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभूच हा रेल्वेमार्ग लवकर पूर्ण करण्यास उत्सुक आहेत. अंबाजोगाई-केज-नेकनूर -जामखेड या शहरातील लोकांच्या ध्यानीमनी नसतानाही अचानक या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेल्वेमार्ग लवकर होण्यासाठी प्रयत्न
घाटनांदूर-श्रीगोंदा हा नवीन प्रस्तावित रेल्वेमार्ग लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गासारखे भिजत घोंगडे होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
-चेतन सौंदळे, सदस्य, रेल्वे कृती समिती, परळी

काम सुरू झाल्याने उत्साहाचे वातावरण
अंबाजोगाईचा नगराध्यक्ष म्हणून २०१० मध्ये काम करताना तत्कालीन रेल्वे बोर्डाचे सदस्य चंद्रकांत खैरे यांनी मराठवाड्यातील रेल्वेमार्गाच्या संदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत मागणीसाठीचा विषय सुचवला होता. या सूचनेचा विचार होऊन मार्गात थोडा बदल करून घाटनांदूर-श्रीगोंदा या नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरू झाले याचा आनंद आहे.
- पृथ्वीराज साठे, माजी आमदार, केज

अंबाजोगाईत रेल्वे येणार असल्याने आनंद
अंबाजोगाई शहर रेल्वेच्या नकाशावर यावे यासाठी मागील ३० वर्षांपासून मी सातत्याने पंतप्रधान, रेल्वेमंत्री, जिल्ह्याचे खासदार, मुख्यमंत्री यांच्याशी स्वत:च्या हस्ताक्षरात निवेदन लिहून त्यावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करत होतो. आता अंबाजोगाई रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याने आनंद होत आहे.
- भारत पसारकर, संयोजक, रेल्वे कृती समिती, अंबाजोगाई