आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादचा केवडा मोलाचा, केवड्याचा दरवळ मुंबई- पुण्यापर्यंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- गणपती बाप्पांच्या आवडीचा पिवळाधमक, सुगंधी केवडा या वर्षी मुंबई-पुण्याच्या बाजारपेठेत कमालीचा भाव खात आहे. बाप्पांच्या मखरामध्ये अनिवार्य समजल्या जाणाऱ्या केवड्याचे उत्पादन उस्मानाबादेत सर्वाधिक प्रमाणात होत असून या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने मुंबई, पुणे, नागपूर आदी महानगरांत केवड्याच्या एका फुलाला १५० ते २०० रुपये भाव मिळू लागला आहे.

उस्मानाबाद शहरालगत सचिन माळी यांच्याकडे दीड एकरावर केवड्याचे बन आहे. या बनामध्ये सुगंधी केवड्याचे उत्पादन घेतले जाते. हे बन सचिन यांच्या आजोबांनी लावले आहे. हिरव्या पानांमध्ये पिवळ्या रंगाच्या सुगंधी केवड्यामध्ये गणपती बाप्पांची आरास शोभा वाढवते. तसेच गणेशोत्सव, गौरीच्या उत्सवामध्ये केवड्याला मानाचे स्थान असते. गणेशाच्या मखरामध्ये केवड्याचे फूल मोलाचे ठरते. किमान केवड्याचे पान तरी असावेच, अशी बाप्पांच्या भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे केवड्याला मागणी वाढत आहे. राज्यातल्या काही भागांत केवड्याचे उत्पादन घेतले जात असले, तरी पिवळ्या रंगाचा केवडा अन्य भागांत मिळत नाही, असे व्यापारी सांगतात. त्यामुळे उस्मानाबादच्या केवड्यावर व्यापाऱ्यांच्या उड्या असतात. या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उत्पादन घटले आहे. दुसरीकडे मागणी वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यातील व्यापारी आठ दिवसांपासून केवडा खरेदीसाठी उस्मानाबादच्या बनात ठाण मांडून बसले आहेत. हे व्यापारी पुणे, मुंबई, नागपूरला केवडा पाठवतात. केवड्याचा दरवळ वर्षातील चार महिने असतो. मात्र, श्रावण महिन्यापासून मागणी वाढते तसेच दरामध्ये वाढ होते.

भाव वाढले
>दुष्काळीपरिस्थिती आणि वाढती मागणी, यामुळे केवड्याचे भाव वाढले आहेत. केवड्याच्या बनात दीड एकरामध्ये वर्षाकाठी लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. या वर्षी वाढलेल्या दरामुळे त्यात वाढण्याचा अंदाज आहे. -सचिन माळी, केवडा उत्पादक शेतकरी, उस्मानाबाद

कुठे आहेत बने ?
बाप्पांचा केवडा भाव खाणार, श्रावण महिन्यात मिळाला ३०० रुपये भाव; नागपूर- पुणे-मुंबईतून मागणी वाढली, अल्प उत्पादनामुळे दर भडकले; दुष्काळाचा फटका

महाराष्ट्रात कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात केवड्याची अनेक मोठे बने होती. अलीकडे ही बने नष्ट होऊ लागली आहेत. सोलापूर जिल्ह्यातही काही भागांत बने आहेत. तसेच नािशक जिल्ह्यात अल्प उत्पन्न घेणारी बने आहेत. उस्मानाबादेत दीड एकराहून अधिक मोठे बन असल्यामुळे मोठ्या शहरांमध्ये पुरवठा होतो. महाराष्ट्रातल्या या महानगरांमध्ये कर्नाटक राज्यातूनही केवडा येतो.

श्रावणामध्ये उच्चांकी दर
बाप्पांच्यामखरामध्ये केवड्याचे महत्त्व असले तरी श्रावण महिन्यातही महादेवाच्या पिंडीवर केवड्याचे फूल वाहण्याची पद्धत आहे. त्यामुळे सोलापूरमधल्या काही व्यापाऱ्यांनी वाढती मागणी लक्षात घेऊन केवड्याचे मोल ३०० रुपयांवर नेले, असे सचिन माळी यांच्या आई शकुंतला माळी यांनी सांगितले.
केवड्या च्याबनात..
केवड्याचेझाड मोठ्या वेलीप्रमाणे वाढते. पाने काटेरी असतात. पानांच्या मध्ये सुगंधी कणीस येते. त्याला केवड्याचे फूल म्हणतात. ही पाने काढणे मोठे जिकिरीचे काम असते. बनातल्या फुलांचा सुगंध दूरपर्यंत पसरतो. त्यामुळे या बनामध्ये साप, नाग वास्तव्य करतात असा समज आहे.