उस्मानाबाद- गणरायाच्या आवडीचा केवडा या वर्षी दुर्मिळ झाला आहे. अगदी गेल्या वर्षीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला केवड्याची फुले पुरवणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातही या वर्षी उत्पादन घटल्याने केवड्याविना बाप्पाचे मखर सजवण्याची वेळ भक्तांवर आली आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यांतही या वर्षी केवड्याचे अवेळी उत्पादन झाल्याने ऐन गणेशोत्सवात केवडा मोलाचा ठरू लागला आहे.
गणेशोत्सवात विविध पाना-फुलांसह फळांच्या विविध प्रकारांनी लाडक्या गणरायाचे मखर सजवण्यात येते. या मखरात मध्यभागी शोभणारा केवडा मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो. सुवासिक, दुर्मिळ आणि मानाचा केवडा भक्तांप्रमाणेच बाप्पांनाही आकर्षित करतो, अशी धारणा आहे. त्यामुळे केवड्याचे कितीही ‘मोल’ असले तरी त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न भक्त करतात. महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, पंढरपूर, पुणे आणि उस्मानाबाद या भागातच केवड्याचे मुबलक उत्पादन आहे. अन्य भागात अल्प प्रमाणावर केवड्याचे उत्पादन होते. उस्मानाबादेत एकरहून अधिक मोठे केवड्याचे बन आहे. दरवर्षी पुणे, मुंबई, नागपूर, हैदराबाद येथील व्यापारी केवड्याची आगाऊ खरेदी करण्यासाठी गणेशोत्सवापूर्वीच उस्मानाबादेत येतात. फुलांची आवक लक्षात घेऊन केवड्याचे दर ठरतात. काही वेळा फुलाला प्रत्येकी २०० रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळतो. व्यापारी केवड्याचा दरवळ महानगरात पोहोचवण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांपर्यंत दर आकारणी करतात. गेल्या वर्षी महाराष्ट्रात केवड्याचे उत्पादन समाधानकारक होते. त्यामुळे १०० ते २५० रुपयांपर्यंत दर होते. या वर्षी उस्मानाबादसारख्या भागात दुष्काळ असल्याने केवडा उत्पादनावर कमालीचा परिणाम झाला असून गणेशोत्सवात लाखो फुले निघणाऱ्या बनात १०० फुले निघणेही दुरापास्त झाले आहे. महाराष्ट्रातील अन्य भागातही उत्पादनावर परिणाम झाल्याने व्यापाऱ्यांनी शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून केवड्याची आयात केली आहे.
दुष्काळामुळे घट
सुवासिक तितकाच औषधी गुणकारी मानल्या जाणाऱ्या केवड्याच्या उत्पादनावर पावसाअभावी परिणाम झाला आहे. काही प्रमाणात श्रावण महिन्यातच केवडा बहरून आला. दरवर्षी ऐन गणेशोत्सवात बहरणाऱ्या केवड्याला पूर्वी १५ दिवस बहर आल्याने केवड्याचे बन जोपासणारे शेतकरी अडचणीत आले आहेत.
केवड्याचा तुटवडा
> यावर्षी श्रावण महिन्यातच काही प्रमाणात फुलांचा बहर येऊन गेला. गणेशोत्सवात मागणी असली तरी दरवर्षीप्रमाणे केवड्याचे उत्पादन मिळू शकले नाही. अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे.
-सचिन माळी, केवडा उत्पादक शेतकरी,
फुलांऐवजी पानांचा वापर
गणरायाला केवड्याचे फूल अतिप्रिय मानले जाते. केवड्याचा सुवास अत्यंत दुर्मिळ असून गणरायाच्या मखरात ठेवलेला केवडा संपूर्ण घराला आठ ते दहा दिवस सुगंध देतो. केवड्याची फुले दुर्मिळ झाल्याने या वर्षी केवड्याच्या पानावर मखर सजवण्याचा काही भक्त प्रयत्न करीत आहेत.