आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरमुडे कुटुंबीयांचा जात पंचायतीविरोधात लढा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- इतर नातेवाइकांनी नाकं मुरडली तरीही मी धीर धरून होतो. पण जेव्हा सख्खे आजोबा आणि चुलते तुम्हाला जातीतून बाहेर काढल्याचे म्हणत बोलायला नकार देतात, एरवी फोन उचलताच नावाने हाक मारणारा मित्र कोण बोलतंय, असं विचारत तुम्हाला जातीतून बाहेर काढले आहे म्हणून मी तुझा नंबर मोबाइलमधून डिलिट केला, असे उत्तर देतो. तेव्हा आपण कोणत्या अग्निदिव्यातून जात आहोत याचा अंदाज आला.

आज बहिणीच्या लग्नाचा प्रश्न समोर आहे. छोटा भाऊ रात्री झोपेतून दचकून उठतो, तो मानसिकदृष्ट्या खचला आहे. पण कितीही संकटं आली तरी जात पंचायती विरोधात असाच लढत राहणार आहे. झिंगाभोई समाजाच्या जातपंचायतीने वाळीत टाकलेल्या मनोज आत्माराम खैरमुडे या युवकाचे हे निर्धाराचे बोल आहेत. त्याच्यावर बेतलेल्या प्रसंगाने आजच्या काळातही जात पंचायतीचा पगडा दाखवून दिला आहे. बायको नांदायला येत नसल्याने फारकतीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या मनोजला जातीच्या न्यायालयाने चक्क जातीतूनच बेदखल केले आहे.

बीड शहरातील आंबेडकर पुतळ्याजवळ राहणाऱ्या मनोज आसाराम खैरमुडे यांची पत्नी शीतल लग्नानंतर तीन महिन्यांनी माहेरी गेली ती परत नांदायला आलीच नाही. मनोज, त्याचे वडील, आई, इतर नातेवाइकांनी अनेकदा शीतलला नांदायला आणण्यासाठी प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ. शेवटी मनोज यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेत शीतल यांना तीन नोटिसा पाठवल्या. पण जातीची पंचायत असताना न्यायालयात का गेला म्हणून मनोज यांच्याविरोधात शीतलच्या माहेरच्यांनी जात पंचायत बसवली. एम.ए. बीएड असलेल्या मनोजला अर्थातच हे पटण्याजोगे नव्हतेच. त्याने न्यायालयाचे कागद पंचायती समोर ठेवत प्रकरण न्यायालयात असल्याने जात पंचायतीने हस्तक्षेप न करण्याची विनंती केली. दारू प्यायलेल्या पंचांनी न्यायालयाच्या कागदांपेक्षा आमच्या शब्दाला किंमत असल्याचे सांगत मनोजच्या कुटुंबाला ५ ऑक्टोबर रोजी वाळीत टाकले आहे. या प्रकरणी मनोजच्या तक्रारीवरून पंच आणि इतर अशा २५ जणांविरोधात पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल होऊनही अटक नाही
मनोजच्या कुटुंबीयांना ना गल्लीतील कुणी बोलते ना नातेवाईक या सगळ्यांचा परिणाम आता कुटुंबावर होत असून छोटा भाऊ दिलीप तणावाखाली असल्याने तो मानसिकदृष्ट्या खचला आहे. या प्रकरणात अॅड. फिडेल चव्हाण आणि अॅड. दीपक ससाणे यांनी मनोज यांना कायदेशीर सहकार्य केले असून आत्महत्येच्या वळणावरील या कुटुंबाचे समुपदेशनही केले आहे. यात गुन्हा दाखल होऊनही कोणासही अटक नाही.

हा आमच्यावर अन्यायच
जातीपंचायतीने आता आम्हाला परत जातीत घेण्यासाठी बारहाटी पंचायत म्हणजे बारागावांच्या लोकांची पंचायत बसवण्याचे सांगितले आहे. यासाठी दीड लाखांचा खर्च सांगितला असून न्याय मागण्यासाठी कोर्टात गेलो हा माझा गुन्हा आहे का. जात पंचायतीने आमच्यावर अन्याय केला आहे.

कलम वाढवावेत
या प्रकरणात अधिक तपास होणे आवश्यक असून खैरमुडे कुटुंबीयांना होत असलेल्या त्रासाबाबत अजून कलम वाढवण्याची गरज आहे. या प्रकरणात असीम सरोदेंसारखे वकीलही न्यायालयात बाजू मांडण्यासाठी तयार आहेत.’’
-अॅड. फिडेल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते