आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्राइम पेट्रोल’ पाहून केला अपहरणाचा बनाव, नरबळीचा प्रयत्न असल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - शहरातील सिंधी बाजार येथून अज्ञात व्यक्तीने आपल्याला उचलून नेले. त्यानंतर एका अंधाऱ्या खोलीत नेऊन आपला खून करण्याचा प्रयत्न झाला. मात्र शिताफीने सुटका केल्याने आपण यातून वाचलो, अशी आपबिती एका १४ वर्षीय मुलाने पोलिसांना सांगितली.  हा प्रकार नरबळी देण्याच्या प्रयत्नातून घडल्याचा तर्क पोलिसांनी लावला.  दहा दिवस तपास केल्यानंतर मात्र ‘क्राइम पेट्राेल’ ही मालिका बघून या बालकाने हा बनाव केल्याचे उघड झाले.   

शहरातील कबाडी मोहल्ला या भागातील चौदा वर्षीय मुलाने ६ ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. या प्रकाराची  माहिती मिळताच पोलिस ठाण्यात मोठा  जमाव दाखल झाला होता. नरबळीच्या प्रयत्नातून हा प्रकार झाल्याचा संशय असल्याने  तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्याची मागणी जमावाने केली.
 
यात पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला. एपीआय सुनीलकुमार काकडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास असला तरी सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे पीआय, एपीआय काकडे, पोलिस काॅन्स्टेबल वसंत धस, कृष्णा तंगे ही टीमही कामाला लागली होती. प्रकरण संवेदनशील असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांनी लक्ष घातले.  शेवटी हा बनाव असल्याचे उघडकीस आले. त्या मुलानेही तशी कबुली दिली आहे.   
 
अन् बनाव उघड: तपासादरम्यान या मुलाकडून सर्व तपशील बारकाईने जाणून घेतला. या बालकाने पोलिसांना एक चिठ्ठी दाखवत त्यावर ‘मार डालुंगा’ असे लिहिले होते. अपहरणकर्त्यानेच आपल्याला ती चिठ्ठी दिल्याचे त्याने सांगितले होते. मात्र त्या चिठ्ठीवरील हस्ताक्षर आणि मुलाचे हस्ताक्षर जुळत असल्याने पोलिसांनी हा बनाव असावा या दिशेने तपास केला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.  

 असा केला तपास: पोलिसांनी शहरालगतच्या व रामतीर्थ पूल परिसरातील सर्व पत्र्याच्या खोल्यांची तपासणी केली. सिंधी बाजार ते रामतीर्थ पूल या मार्गावर असणारे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. शिवाय या मार्गावरील व्यापारी, विक्रेते, फेरीवाले व रिक्षाचालकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
 
अशी होती मुलाची तक्रार    
सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मी चंदनझिरा येथील शाळेत जात असताना सिंधी बाजार येथून अज्ञात व्यक्तीने आपणास पळवले. दीड तासाने जाग आली तेव्हा मी एका अंधाऱ्या खोलीत होतो. अंगात काळे कपडे, लांब केस, गळ्यात माळा व एक पाय जळालेल्या इसमाने माझ्या तोंडाला काळे लावले.  तो मला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच वेळी एक मौलाना तेथे आले व त्यांनी  हात सोडल्याने पळून आलो, असे या बालकाने पोलिसांना सांगितले होते.
बातम्या आणखी आहेत...