आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्लारी भूकंप: वीस वर्षे पूर्ण, राज्यातला सर्वात मोठा पुनर्वसन प्रयोग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- तीस सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या किल्लारीच्या भूकंपाला आज वीस वर्षे पूर्ण झाली. या काळात भूकंपग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्थांनी निकराचे प्रयत्न केले. राज्यातला सर्वात मोठा पुनर्वसन प्रयोग म्हणून किल्लारीचे उदाहरण दिले जाते. मात्र, भूकंपग्रस्त भागातील नागरिकांचे मानसिक पुनर्वसन अखेरपर्यंत झालेच नाही.

आपत्ती निवारणाच्या अनुषंगानेही समाजशिक्षणाचे काम पूर्णत्वास गेले नाही. गंमत म्हणजे एकीकडे भूकंपानंतर सातत्याने बसत असलेल्या लहान-मोठय़ा हादर्‍यांमुळे भीतीचे सावट कायम राहिले आहे, तर दुसरीकडे याच परिसरात भूकंपासंदर्भातील राष्ट्रीय आपत्ती निवारणाचे निर्देश धाब्यावर बसवून इमारतींचे इमले उभारले जात आहेत. एवढेच नव्हे तर 20 वर्षांत तरुण झालेल्या नव्या पिढीची नाळ भूकंपापासून पूर्णपणे तुटली आहे. त्यांना आपल्याच गावात झालेला भूकंप आणि त्याची तीव्रता केवळ ऐकून माहीत आहे, तीही ज्येष्ठांच्या गप्पांतून. कारण करोडो रुपये खर्च करून गावेच्या गावे उभारणार्‍यांना भूकंपाची माहिती सांगणारे, तीव्रता दर्शवणारे एखादे संग्रहालयही उभारता आले नाही.

भूकंपाचे अनुभव, कथा, दंतकथा हे सर्वांना तोंडपाठ; पण ठोस माहिती कुणाकडेच नाही अशी स्थिती. त्याचे कारण आहे ते आपल्याकडच्या ‘डॉक्युमेंटेशन’च्या अनास्थेत. ही अनास्था जेवढी सरकारी पातळीवर आहे तितकीच ती जनमानसातही आहे. त्यामुळेच करोडो रुपये खर्च करून या भागात पुनर्वसनाचे काम करण्यात आले. पडलेली घरे नव्या ठिकाणी बांधून देण्यात आली. रुग्णालये, शाळा, बाजारपेठा नव्याने उभ्या राहिल्या. मात्र, भूकंपाची वस्तुनिष्ठ माहिती सांगणारे एखादे संग्रहालय उभारण्यात आले नाही. त्यामुळेच 20 वर्षांत तरुण झालेल्या पिढीला आपल्या भागातील प्रलयंकारी भूकंप फक्त ऐकून माहीत आहे. त्यातही एखादा हुशार तरुण असेल तर त्याला परिवारातल्या आणि शेजारच्या घरातील मृतांची नावे माहीत असतील; पण त्या त्या गावांतील ग्रामपंचायतींमध्येही आपल्या गावातील भूकंपाच्या वेळेसची माहिती उपलब्ध नाही. जी आहे ती सरकारी पठडीतील. अनुदानासाठीच्या आणि सवलतीसाठीच्या गरजेपोटी अनेकांनी नावे सरकारी यादीत घुसडलेली, तर काहींची अज्ञानापोटी वगळलेली.

नव्या पिढीत आत्मभान
भूकंपाचा मानसिक ताण अनेकांना सहन झाला नाही. मात्र, तो दूर करण्याच्या अनुषंगाने काहीच प्रयत्न झाले नाहीत. सरकार नावाची यंत्रणा केवळ घरे बांधून देण्यात व्यग्र राहिली आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न तोकडे पडले. मानसिक पुनर्वसनाच्या अभावामुळे आत्महत्या, मनोरुग्णता, व्यसनाधीनता, आत्मविश्वास गमावून बसणे आदी समस्या निर्माण झाल्या. त्या आजतागायत कायमच आहेत. सुदैवाने नव्या पिढीत आत्मभान आले आहे, हे कौतुकास्पद आहे.

बांधकामेच बांधकामे : दगडी भिंती आणि पांढर्‍या मातीचे माळवद (छत) ही या भागातील सधन कुटुंबाच्या बांधकामाची साधने होती. भूकंपानंतर माळवद आणि दगडांच्या भिंती जीवघेण्या ठरल्या. त्यामुळे भूकंपप्रवण ठरलेल्या या भागातील इमारतींच्या बांधकामाची पद्धतच बदलणे गरजेचे होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेने निर्देशही दिले आहेत. मात्र, नियम डावलून मोठय़ा प्रमाणात बांधकामे झाली.

जनजागृती नाही
भूकंपग्रस्त भागात आजही सातत्याने लहान-मोठे धक्के बसतात. त्यामुळे अनेक जण आजही पक्क्या घरांमध्ये झोपत नाहीत. धक्का बसून पत्रे वाजायला लागली, भांडी हलायला लागली की लोक क्षणात घराच्या बाहेर येऊन थांबतात. मात्र, त्यांची ही कृती अनुभवातून आलेली आहे. या भागात सरकारने भूकंपासारख्या आपत्तीची माहिती देणारी, पूर्वसूचना देणारी यंत्रणा उभारलेली नाही. एवढेच नव्हे, तर भूकंपाबाबत जनजागृती करण्याची तसदी घेतलेली नाही. अशी आपत्ती आलीच तर स्वत:चा आाणि इतरांचा जीव वाचवणे, नुकसान टाळण्यासाठी काळजी घेणे याची माहिती नव्या पिढीला सातत्याने सांगत राहणे गरजेचे आहे. भूगोल-नागरिकशास्त्राच्या पाठय़पुस्तकांत अशा बाबींचा समावेश करून, भित्तिपत्रके तयार करून, चित्रांच्या माध्यमातून याबाबत जाणीव-जागृती करणे गरजेचे आहे.

धक्क्यांची संख्याच उपलब्ध नाही
1993 पासून आजपर्यंत किमान हजार-एक लहान-मोठे धक्के बसले असतील. त्यांची तीव्रता 1 ते 3 रिश्टर स्केलपर्यंत होती. या नोंदी घेण्यासाठी प्रारंभी किल्लारीत भूकंपमापन यंत्र बसवण्यात आले. पुढे ते कधी बंद पडले हे ग्रामस्थांनाही कळले नाही. लातूरला असेच एक केंद्र उभारण्यात आले. जगात कुठेही भूकंप झाला, तरी त्याची नोंद या केंद्रात होते. मात्र, आतापर्यंत किती वेळा किती तीव्रतेचे भूकंप झाले याची नोंद तेथे नाही आणि ती प्रशासनाकडेही उपलब्ध नाही.