आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : किल्लारी भूकंप, २३ वर्षांनंतरही जखमा अजून ओल्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९९३ मध्ये सप्टेंबर महिन्यात ३० तारखेला प्रलयंकारी भूकंप झाला होता. - Divya Marathi
१९९३ मध्ये सप्टेंबर महिन्यात ३० तारखेला प्रलयंकारी भूकंप झाला होता.
लातूर -लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १९९३ मध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाला आज २३ वर्षे पूर्ण झाली. आप्तजनांच्या मृत्यूच्या वेदना चिरकाल टिकणाऱ्या असल्या तरी नव्या पिढीने दु:ख बाजूला सारून जगण्याच्या लढाईला नव्याने सुरुवात केली आहे.

लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीत १९९३ मध्ये सप्टेंबर महिन्यात ३० तारखेला प्रलयंकारी भूकंप झाला होता. सरकारी आकड्यांनुसार ७ हजार ९२८ जणांचा त्यात मृत्यू झाला. प्रत्यक्षात अनेकांचे मृतदेह मिळाले नाहीत. त्या घटनेला आता २२ वर्षे झाली. भूकंपाच्या वेळी लहान असलेली पिढी आता तारुण्यात आहे. त्या तरुणांनी आपल्या जगण्याची लढाई नव्याने सुरू केली आहे. भूकंपात आप्तांना गमवावे लागणे हे वेदनादायी होते. मात्र, अशा समस्यांवर काळ हेच त्यावरचे एकमेव औषध असते. बावीस वर्षे हा तसा मोठा कालखंड. विशीत असलेल्यांनी भूकंप केवळ ऐकला आहे. तर पंचविशीतल्यांना तो अंधुकसा आठवतो.

किल्लारीच्या पंचविशीत असलेल्या सतीश जाधव या तरुणाला बोलते केले असता तो म्हणाला की, किल्लारीनंतर झालेल्या गुजरातमधील भूकंपग्रस्तांना ज्या सुविधा मिळाल्या, त्यांचे ज्या उत्तम पद्धतीने पुनर्वसन झाले ते आपल्या भागात का झाले नाही? या त्याच्या प्रश्नाचे
उत्तर कोणाकडेच नाही.

भूकंपाकडून काहीच नाही शिकलो : महाराष्ट्रात किल्लारीचा भूकंप हा सर्वात प्रलंयकारी होता. त्यानंतर कोयना परिसरात झालेल्या भूकंपाची आठवण होते. १९९३ नंतर अगदी सहा महिन्यांपूर्वीपर्यंत किल्लारी परिसरात हजारो लहान-मोठे धक्के बसले आहेत. त्यांची संख्या इतकी जास्त आहे की त्याची नोंदही लातूरच्या भूकंपमापन केंद्रात नाही. मात्र, भूकंपाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा या भागात उभी करता आली नाही.

नावापुरता चित्रपट आला
तीन-चार महिन्यांपूर्वी "किल्लारी' नावाचा एक चित्रपट आला होता. भूकंपग्रस्तांच्या व्यथा-वेदनांवर हा चित्रपट बेतला असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र या चित्रपटात केवळ काही मोजकी दृश्ये सोडली तर किल्लारीच्या भूकंपाचा कसलाही संबंध नव्हता.

बंद पाळून श्रद्धांजली
किल्लारी परिसरात ३० सप्टेंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. सर्व व्यवहार बंद ठेवून भूकंपात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. बुधवारी तहसीलदारांच्या हस्ते किल्लारीतील स्मारकावर अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
३० सप्टेंबर १९९३ भूकंप आकड्यांत
- ३.५६ मिनिटांनी
- ६.०४ रिश्टर स्केलची तीव्रता
- ५२ गावांतील ३० हजार घरे पडली
- ७,९२८ माणसे मृत्युमुखी
- १६,००० जण जखमी
- १५,८५४ जनावरांचा मृत्यू
- १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे
पुढील स्‍लाइड्सर पाहा अंगाचा थरकाप उडवणारे भूकंपाचे तत्‍कालीन फोटोज....