आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Killed Nine In Three Accident ;four Women And Two Child Invovled

तिहेरी अपघातात नऊ ठार;मृतांमध्ये चार महिला व दोन बालकांचा समावेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - उसाचा ट्रक, बोलेरो जीप व अ‍ॅपेरिक्षाच्या विचित्र अपघातात नऊ जण ठार, तर 12 जण जखमी झाले. मृतांमध्ये चार महिला व दोन बालकांचा समावेश आहे. हा अपघात नांदेड-वसमत मार्गावरील मालेगाव येथे सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता घडला. जखमींना नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जीपमधील मारुती शंकर पांचाळ (45), लालू लक्ष्मण उडतेवार (50), रुख्मिण शंकर पांचाळ (61), सुरेश गोविंद गंदपवार (30), शोभा लालू उडतेवार (45, सर्व रा. तळेगाव), अ‍ॅपेरिक्षातील तबस्सुम शेख मजहर (30), रिआज शेख अजहर (8, दोघे रा. परभणी), सविता गंगाप्रसाद जाधव (22, रा. सेलगाव)अशी मृतांची नावे आहेत. मृतांमधील सविता जाधव ही महिला गर्भवती होती. एका मृताची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नाही.

उमरी तालुक्यातील तळेगाव येथील मारुती शंकरराव पांचाळ (45) यांचे कुटुंबीय सोमवारी हिंगोली जिल्ह्यातील बोरजा येथील साखरबाबांच्या दर्शनाला गेले होते. सायंकाळच्या सुमाराला साखरबाबांचे दर्शन घेऊन ते परतत असताना मालेगाव विश्रामगृहासमोर त्यांच्या बोलेरो जीपला (एमएच 26 एएफ 2619) उंचेगाव (ता.हदगाव) येथून पूर्णा सहकारी साखर कारखान्याकडे जाणा-या उसाने भरलेल्या ट्रकने (एमएच 30 व्ही 2911) समोरून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यामुळे बोलेरो जीप कापत गेली. जीपच्या मागे अ‍ॅपेरिक्षा (एमएच 26 जी 6301) येत होता. जीपचा चुराडा झाल्यानंतर हा ट्रक अ‍ॅपेरिक्षावर धडकला. सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

जखमींची नावे : शोभा मारुती पांचाळ (40), प्रल्हाद किशन पांचाळ (40), शारदा प्रल्हाद पांचाळ (50), सुधाकर नामदेव कंधारे (40), अनसूया गोविंद गंदपवार (45), मधुकर बाबूराव बोल्लेवार (30), माधव शंकर पांचाळ (40, सर्व रा. तळेगाव), अब्दुल रहीम शेख रब्बानी (22, रा. अर्धापूर), आवेश शेख मजहर (12, रा. परभणी), मुजाबीर मुनीर (50, रा. अर्धापूर), मुंजाजी सखाराम राजेगोरे (65, रा. शेळगाव).

मद्यपी ट्रकचालक फरार
दुपारी साडेतीनच्या सुमारास ट्रकचालकाने मद्य प्राशन केले होते. त्यानंतर तो भरधाव निघाला. कामठा गावाजवळ काही नागरिकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो तसाच सुसाट पुढे गेला. त्यानंतर ही घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली.

पाच गंभीर
या अपघातातील 12 जखमींना नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन. जी. राठोड यांनी सांगितले.