आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolakhed In Monster Appetite Stomach Attack On Man

भुकेपोटीच मगरीचा कोळखेडला माणसावर हल्ला, आरोपींना पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- कोळखेड येथे ग्रामस्थांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या मगरीचे रविवारी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. तिच्या पोटात केवळ खेकडे निघाले असून भुकेपोटी तिने माणसावर हल्ला केला असल्याची साक्ष यातून मिळाली आहे. ती मगर मार्श क्रोकोडाइल प्रजातीतील असून गोड्या पाण्यात तिचा अधिवास असतो.
अन्य प्रजातींपेक्षा मार्श क्रोकोडाइल ही तशी शांत असते. ती मांसाहारी आहे. खेकडे, मासे, पक्षी व अन्य जलजीव हे तिचे खाद्य आहे. संथ गतीने चालत वा पोहत येऊन सावज टिपणे ही या प्रजातीची खासियत असते. जबडा, दात व शक्ती या उपजत गुणांमुळे ती वासरे, शेळ्या अथवा मोठ्या पशूंचीही शिकार करू शकते. धोका वाटला अथवा भक्ष्य मिळाले नसेल तर अशा वेळी तिच्या टप्प्यात येणाऱ्या कोणावरही ती हल्ला करू शकते, असे मुंबईच्या वन्यजीव अभ्यासक एेश्वर्या श्रीधर यांनी सांगितले. भारत, पाकिस्तान, बांगलादेश,श्रीलंका, नेपाळ या देशांतील गोड्या पाण्याचे सरोवर, नद्या, कॅनाॅल व दलदलीच्या प्रदेशात ही प्रजात आढळत असल्याचे त्या म्हणाल्या.

कोळखेडचा तलाव जुना असून त्यात मगरीचे वास्तव्य असल्याची कल्पना गावकऱ्यांना नव्हती. तलावाकाठी चरायला गेलेल्या अनेक शेळ्यांतील एखादी शेळी तर कधी वासरू गायब होत असे. लांंडग्या-कोल्ह्याने अथवा चोरट्याने ते पळवले असावे, असा तर्क करीत गावकरी यावर कोठे तक्रार करीत नसत. परंतु अशातच शेळ्या व वासरे गायब होण्याच्या संख्येत वाढ झाली होती. शुक्रवारी त्या गावातील एक जण खेकडे व मासेमारीसाठी तलावात गेला असता मगरीने त्याच्या पार्श्वभागाचा चावा घेतला. घाबरून गतीने तलावाबाहेर येऊन त्याने तलावाकडे पाहिले असता त्याला ती महाकाय मगर दिसली. त्याने ही घटना ग्रामस्थांना सांगितली असता आजवर गेलेली वासरे व शेळ्यांची शिकार या मगरीनेच केली असल्याची खात्री त्यांना पटली व त्यांनी तिची हत्या केली.

आरोपींना पोलिस कोठडी
मगरीच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली. महादेव लिंबाजी चव्हाण (३५) व रवी मारोती चव्हाण (२३) अशी आरोपींची नावे आहेत.

अधिकाऱ्यांवर आरोप, निलंबनाची मागणी
उदगीरचे वनरक्षक पायाळ व वनपाल वंजे यांना या मगरीला इतरत्र हलवण्याची सूचना कोळखेडच्या ग्रामस्थांनी केली होती. तथापि, हे प्रकरण वंजे यांनी गांभीर्याने घेतले नाही. उलट अशा प्राण्याच्या विल्हेवाटीची सोय आमच्याकडे नाही, मगरीचे तुम्हाला जे करायचे ते करू शकता, असे सांगितले. नाइलाज झाल्याने गुरांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांना मगरीचा जीव घ्यावा लागला. संंबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली असून त्यास तेच जबाबदार असल्याने त्यांना निलंबित करावे.
राहुल केंद्रे,भाजयुमोचे सरचिटणीस

अनुसूची एकमधील प्राणी
मगर ही अनुसूची एकमधील प्राणी असून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत तिला सर्वोच्च संरक्षण देण्यात आले आहे. या प्राण्याची शिकार केल्यास सहा वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड अथवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
सुजित नरवडे, शास्त्रज्ञ, बीएनएचएस इंडिया

आरोप बिनबुडाचे
राहुल यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. आमचा कर्मचारी तेथे वेळेत गेला होता. तथापि, ग्रामस्थांनी त्यास तेथे येऊ दिले नाही. शेवटी पोलिस ठाण्यात जावे लागले व त्यांच्या संरक्षणात घटनास्थळ गाठावे लागले.
जी.एस. साबळे, सहायक वनसंरक्षक