आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोथिंबिरीच्या किंमतवाढीचा फुगा लातूरच्या बाजारात फुटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - नाशिकच्या बाजारात कोथिंबिरीला ‘न भूतो..’ भाव मिळाल्याने हा विषय इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी ब्रेकिंगचा ठरला, तर मुद्रित प्रसार माध्यमांनी त्याला पहिल्या पानावर जागा दिली. परंतु तो विक्रमी दराचा फुगा लातूरच्या बाजारात गिरक्या घेऊ शकला नाही. परिणामी तो फुस्स होऊन गेला.

कोथिंबिरीच्या एका जुडीला 340 रुपये असा विक्रमी भाव ऐकून येथील व्यापारी चक्रावले, तर ग्राहक धास्तावले. दुसरीकडे सुगीचे दिवस आल्याच्या भ्रमात शेतकरीही खुशीची गाजरे खाऊ लागले. परंतु प्रत्यक्षात हे मृगजळच ठरले. पर्यायाने गेल्या तीन महिन्यांपासून येथील बाजारात सुरू असलेला कोथिंबिरीचा प्रतिकिलोचा 60 ते 80 रुपयांदरम्यानचा भाव कायम आहे. दुसरकडे जूनच्या एक तारखेपासूनच रिमझिम का असेना, पावसाने हजेरी लावल्याने त्याचे सकारात्मक परिणाम बाजारात दिसू लागले आहेत. त्यामुळे शिवारात हिरवेपणा आला आहे. त्यातून जुन्या लागवडीच्या भाजीपाल्याला बळ मिळाले असून मृगातील नवीन लागवडीच्या भाज्या तरारल्या आहेत. परिणामी दोन टनांच्या आसपास गेलेली आवक आता 10 टनांच्या पुढे सरकली आहे. ही आवक लातूर परिसर, पुणे, नाशिक आणि बेळगाव येथून होत आहे. त्यामुळे आकाशाला भिडलेल्या दरांनी जमिनीकडे सरकणे सुरू केले आहे. त्यामुळे भावही हळूहळू कमी होऊ लागले आहेत.

गत आठवड्यात 45 ते 50 रुपये किलोने विक्री झालेली गवार 10 ते 15 रुपयांवर आली आहे, तर वांग्याचीही अशीच अवस्था झाली आहे. टोमॅटोच्या दरात 3 ते 8 रुपयांनी घसरण झाली आहे. 30 ते 35 रुपये किलोने विकलेले लिंबू आता 10 ते 15 रुपयांवर आले आहेत. 16 ते 18 हजार प्रतिक्विंटल झालेला अद्रकचा भाव आता 12 हजार ते 15 हजारांपर्यंत खाली उतरला आहे. नगण्य झालेली मेथीची आवक आता बर्‍यापैकी सुरू झाली आहे. त्याच्या एका जुडीला 10 ते 15 रुपये असा भाव आला आहे. कांद्याच्या दरात 3 ते 4 रुपयांनी वाढ, तर लसूण 5 ते 10 रुपयांनी उतरला आहे. बटाट्याचे दर स्थिर आहेत.

कोथिंबिरीवरून वाद
नाशिक येथील कोथिंबिरीचे भाव पाहून शेतकरी वाद घालू लागले आहेत. आम्ही टीव्हीवर पाहिले असून वर्तमानपत्रात वाचले आहे. तसा भाव लातुरात कसा नाही, असा सवाल विचारत आहेत. त्यामुळे व्यापारी आणि शेतकर्‍यांत वाद होऊ लागले. तिकडे कोथिंबिरीला चमत्कारिक भाव कसा मिळला, यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. सुभाष ठोंबरे, अध्यक्ष, भाजीपाला आडत असो., लातूर