आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतीचं अंत्यदर्शनही होऊ शकलं नाही !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - अठरा दिवसांपूर्वी मलेशियाला जाताना विमान दुर्घटना झाली..पाच भारतीय हिंद महासागरातील दुर्घटनाग्रस्त विमानात अडकले आणि यात आमच्या क्रांतीचं नाव समजलं. सगळ्यांनाच हादरा बसला. तेव्हापासून रोज बातम्यांकडे डोळे लागलेले असायचे. विमान हायज्ॉकच्या बातम्यांनी आशा पल्लवित व्हायच्या. रात्ररात्र त्याकडेच डोळे लावून बसायचो. मलेशियाच्या पंतप्रधानांनी एकदाचं जाहीर केलं आणि सार्‍याच आशा मावळल्या! वडिलांनी परिस्थितीवर मात करून उच्चशिक्षण दिलं. आम्हा भावंडांना आणि क्रांतीच्या संसारातही सुखाचे दिवस येत असल्याचे नियतीला मान्य नव्हतं. मृत्यू कोणालाच चुकलेला नाही; मात्र आम्हाला क्रांतीचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही.. ! असे सांगत क्रांतीचे बंधू आणि येथील अँड. अशोक हंगे यांना अश्रू अनावर झाले.

मूळ हंगेवाडी (ता. केज) येथील रहिवासी डॉ. रामराव हंगे खासगी वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने बीडला आले आणि स्थायिक झाले. कम्युनिस्ट विचारसरणी असलेले डॉ. हंगे यांनी दोन मुले, दोन मुलींना उच्चशिक्षण देण्याचे ठरवले आणि उच्चशिक्षित करून लग्ने करून दिली. अँड. अशोक थोरले. त्यांच्या पाठची क्रांती. बीडमध्ये शिक्षणातही ती चांगली चमकली. पुढे तिने एम.एस्सी.बी.एड. पूर्ण केलं. पाथर्डी तालुक्यातील टप्पापिंपळगाव येथील प्रल्हाद सिरसाट यांचं स्थळ चालून आलं आणि रशियात एम.टेक. पर्यंत शिक्षण घेऊन मोठय़ा नोकरीत असलेले प्रल्हाद यांच्याशी क्रांतीचं लग्न झालं. या दांपत्याला दोन गोंडस मुले झाली. प्रल्हाद हे नोकरीनिमित्ताने बाहेरच्या देशात राहत. क्रांतीने मात्र मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक होण्याचं ठरवलं.

पुण्यात ती एकलव्य पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी करू लागली. प्रत्येक कामात सक्रिय,ध्येयवादी असलेली क्रांती गुणवत्तेच्या बळावर पतीला साथ देत होती. प्रगतीची शिखरं पार करत होती. मात्र, नियतीला हे मान्य नव्हतं.! असे सांगून अँड. हंगे म्हणाले की, दोन्ही मुलांना पुण्यात ठेवून पतीला भेटण्यासाठी मलेशियाला गेलेली क्रांती आठ मार्चला विमान दुर्घटनेत अडकलेल्या पाच भारतीयांपैकी एक असल्याचं समजलं आणि काळजात धडकी भरली. तेव्हापासून हंगे आणि सिरसाट कुटुंब दु:खात बुडून गेले. अठरा दिवसांपासून रोजच टीव्हीसमोर सगळे जण बसलेले असायचो. मात्र, मलेशियाच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं आणि उरल्यासुरल्या सगळ्या आशा संपून गेल्या. संकटावर मात करून सुखाचे दिवस कुठे तरी येत असल्याचं नियतीला मान्य नव्हतं. कठोर मेहनतीच्या बळावर यश मिळवणार्‍या क्रांतीचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही, यासारखं दुसरं दुर्दैव कोणतं? सध्या तिचा नवरा, मुलं पिंपळगावलाच आहेत. किती दिवस दु:ख करत बसलो, तरी ती थोडीच परत येणार ? आता मुलं व प्रल्हाद पुण्याला जातील.. असे म्हणत पुढे बोलण्यास अँड. हंगे यांना शब्दही फुटले नाहीत.