आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kshirsagar Family 5th Generation At Malegaon Yatra

क्षीरसागर घराण्याची पाचवी पिढी माळेगावच्या यात्रेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- माळेगावची यात्रा जशी खंडोबासाठी प्रसिद्ध आहे तशीच ती घोड्यांच्या बाजारासाठीही प्रसिद्ध आहे. अनेक घराणी यात्रेत आपल्या घोड्यांसह हजेरी लावतात. स्व. विलासरावांचे वडील दगडोजीराव माळेगावच्या यात्रेत घोडी माधुरीसह मुक्कामाला असत. आता दोघेही पितापुत्र नाहीत; परंतु यात्रेत माधुरीची मात्र हजेरी आहे. स्व. विलासरावांचे जानी दोस्त स्व. गोपीनाथ मुंडे यांचा राजा घोडाही यात्रेत आला. देशमुख-मुंडेंचे घोडे यात्रेचे आकर्षण समजले जाते. आडगाव येथील क्षीरसागर गुरुजींच्या घराण्याचीही अशीच परंपरा असून यंदा पाचवी पिढी घोड्यासह यात्रेत तळ ठोकून आहे.

भगवानराव क्षीरसागर आडगावकर हे वयाच्या दहाव्या वर्षापासून आजोबासोबत यात्रेत येत असत. आता त्यांचे वय ७२ वर्षांचे आहे. यावर्षी ते नातू कैवल्य संतोषकुमार क्षीरसागरसह राणी घोडी घेऊन यात्रेत आले आहेत. नुकरी जातीची राणी घोडी सर्वगुणसंपन्न असल्याचा त्यांचा दावा आहे. पांढऱ्या रंगाची ही घोडी खडीबहाद्दर आहे व ती शुभ मानली जाते. डाॅ. मंगेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता संतोष क्षीरसागर यांचे भगवानराव वडील आहेत. तंबू ठोकून ते घोड्यासह यात्रेत मुक्कामी आहेत. यात्रेतील दुर्मिळ घोड्यांपैकी त्यांची राणी घोडी आहे.

चार लाख रुपये किमतीच्या त्यांच्या घोडीला आजही खरेदीदार आठ लाख रुपयांपर्यंत किंमत देण्यास तयार आहेत; परंतु कौटुंबिक परंपरा पाळत ते यात्रेला आले आहेत. कैवल्यच्या रूपात त्यांची पाचवी पिढी राणी घोडीसह यात्रेत सहभागी झाली आहे.