आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाची वाटचाल राजकीय अस्थिरतेकडे : केतकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - सन 2008 नंतर संपूर्ण जगात आर्थिक अस्थिरता आल्याने जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्था अत्यंत अडचणीत सापडली आहे. त्यामुळे असंख्य देश संकटात सापडले असून, या आर्थिक भूकंपाचे केंद्र अमेरिका आहे. त्यातूनच जगाची वाटचाल राजकीय अस्थिरतेकडे सुरू आहे, असे भाष्य दैनिक ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक पद्मश्री कुमार केतकर यांनी केले.
उदगीर येथे आयोजित उज्ज्वला देशमुख स्मृती व्याख्यानमालेत ‘जागतिकीकरणातील भारत’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी डॉ. मधुकरराव कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर, सुभाष देशपांडे आदी उपस्थित होते. जेव्हा अर्थव्यवस्था अडचणीत येते, तेव्हा राजकीय वाटचालही अडचणीत येते, असे स्पष्ट करून केतकर म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था 1990-91 च्या दरम्यान अतिशय अडचणीत होती. त्या वेळी भारताने 20 टन सोने इंग्लंडच्या बँकेत तारण ठेवले होते.
कुठलाही देश भारताला कर्ज देण्यास तयार नव्हता. भारताचा मित्र असलेल्या सोव्हिएत युनियनचेही तुकडे झाले होते. देश अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जात होता. इराकने कुवेतवर हल्ला केल्याने तेलाच्या किमती भयंकर वाढल्या होत्या. हेच कारण भारताच्या आर्थिक दुर्दशेचे होते. नंतरच्या काळात राजीव गांधींची हत्या झाली.
त्यातच मंडलवाद्यांचे मोर्चे, निवडणुका आदी बाबींमुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झाले होते. शिवाय देशात आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक समस्या निर्माण झाल्या होत्या. अशा गोंधळाच्या वातावरणात निवडणुका पार पडल्या. त्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी आर्थिक उदारीकरण स्वीकारले. त्याला अन्य पक्षांचा विरोध सुरू झाला.

विरोधकांचे दुटप्पी धोरण
गॅटविरोधातील प्रचारामुळे सन 1996 मध्ये काँग्रेसचे सरकार कोसळले. त्यानंतर 96 ते 98 या काळात चार सरकारे देशावर आली. ही सरकारे काँग्रेस विरोधकांची होती, परंतु त्यांनी गॅटला विरोध केला नाही. त्यातून त्यांचे दुटप्पी धोरण देशाने पाहिले. भारताने जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळेच देशाची, देशातील मध्यमवर्गीयांची प्रगती होऊन आर्थिक सुबत्ता आली. हा जागतिकीकरणाचा परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.