परभणी - सेलू तालुक्यातील निम्न दुधना सिंचन प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात काम करत असताना मातीच्या ढिगा-याखाली सापडून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १९) घडली. नंदकिशोर आत्माराम गोरे (१९, रा. हिस्सी) असे मृत मजुराचे नाव आहे. या घटनेत एक मजूर जखमी झाला आहे. तिढी पिंपळगाव शिवारात निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात
पुलाचे काम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सात ते आठ मजूर त्या ठिकाणी काम करत होते. मुख्य कालव्यात काम करत असताना साइड वॉलचा मातीचा ढिगारा कोसळला. नंदकिशोर गोरे याचा ढिगा-याखाली दबून मृत्यू झाला, तर अप्पासाहेब राऊत (३०, रा. हिस्सी) याला मुकामार लागला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणांना बाहेर काढले. त्यांना तत्काळ सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी नंदकिशोरला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या
ताब्यात देण्यात आला.
गोरे याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेमुळे हिस्सी गावावर शोककळा पसरली आहे.
मी इथेच आहे
शुक्रवारी सकाळी १५ ते २० फूट खोल मुख्य कालव्यात सात ते आठ मजूर पुलाचे काम करत होते. अचानक मातीचा ढिगारा कोसळला. बाजूला काम करणारे मजूर बचावले. सहकारी ढिगा-याखाली असल्याचे लक्षात येताच मजुरांनी माती बाजूला करण्यास सुरुवात केली. त्या वेळी ढिगा-यातून मी इथेच आहे, असा आवाज नंदकिशोर देत होता. त्याचे हे बोलणे अखेरचे ठरले, असे श्रीरंग औटे या मजुराने सांगितले.