आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याअभावी परळीचे थर्मल बंद, दुष्काळाचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - खडका बंधा-यातील पाणीसाठा संपल्याने अखेर परळी येथील वीजनिर्मिती केंद्र बंद पडले आहे. केंद्र बंद पडल्याने दहा हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील तीन वर्षांत पाण्याअभावी तीन वेळा हे वीजनिर्मिती केंद्र बंद पडले आहे.

परळी येथे २१० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचे तीन व २५० मेगावॅट क्षमता असलेले दोन संच आहेत. पाच संच पूर्ण क्षमतेने चालल्यास ११३० मेगावॅट वीजनिर्मिती होते. त्यासाठी दररोज १८ हजार मेट्रिक टन कोळसा व एक लाख मीटर क्यूब पाणी लागते. पाच दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या सोनपेठ तालुक्यातील खडका बंधा-यातून वीजनिर्मिती केंद्राला पाण्याचा पुरवठा होतो. यंदा जून महिना संपला तरी पाऊस झाला नसल्याने खडका बंधारा कोरडा पडला आहे. बंधा-यात पाणी नसल्याचा फटका वीजनिर्मिती केंद्राला बसला आहे. पाण्याअभावी येथील केंद्रातील चालू असलेला २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सहा गेल्या आठवड्यात बंद करण्यात आला होता. २१० मेगावॅट क्षमता असलेला संच क्रमांक पाच सोमवारी सकाळी बंद केला. शेवटपर्यंत चालू राहिलेला २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सात मंगळवारी रात्री बारा वाजता बंद करण्यात आला. पाण्याअभावी येथील सर्व संच बंद पडल्याने येथे वीजनिर्मिती बंद पडली आहे.

दुष्काळाचा वीज केंद्रावर परिणाम
परळी येथील वीज केंद्र मागील तीन वर्षांत पाण्यामुळे दोनदा बंद करण्याची वेळ आली आहे. खडका बंधा-यातील पाणी संपल्यास माजलगाव किंवा पैठण धरणातून पाणी सोडण्यात येते. तीन वर्षांपासून मराठवाडा दुष्काळात होरपळत असल्याने माजलगाव व पैठणच्या धरणांनी ऐन पावसाळ्यात तळ सोडलेला नाही. त्यामुळे पाण्याअभावी वीजनिर्मिती केंद्र बंद पडल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका
केंद्राला बसला आहे.

तीनदा केंद्र पडले बंद
मागच्या तीन वर्षांत पाण्याअभावी येथील वीजनिर्मिती केंद्र बंद पडले आहे. २०१३ मध्ये फेब्रुवारी ते जुलैपर्यंत तब्बल सहा महिने वीजनिर्मिती केंद्र बंद पडले होते. मागील वर्षी २०१४ मध्ये संपूर्ण ऑगस्ट महिना केंद्र बंद होते. यंदा बुधवारपासून वीजनिर्मिती केंद्र बंद पडले आहे. वीजनिर्मिती केंद्राच्या इतिहासात सलग तीन वर्षांत तीन वेळा केंद्र बंद पडले आहे.

दहा हजार कामगारांचा प्रश्न
वीजनिर्मिती केंद्र सुरू असो वा बंद, केंद्रातील एक हजार पाचशे अधिकारी व कर्मचा-यांच्या वेतनाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याशिवाय शासनाचे करही भरावे लागतात. या केंद्राला वीज वितरण कंपनीकडून विकतची वीज घ्यावी लागते. येथील वीजनिर्मिती केंद्राबरोबरच यंत्रणेकडे रोजंदारीवर काम करणारे सुमारे दहा हजार कामगार आहेत.