आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर प्रसूती झालेली महिला रुग्णालयातही एकाकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - शेवगाव (जि.नगर) येथून कामानिमित्त बीडला एकटीच निघालेली गरोदर माता गेवराईत वाहनातून उतरताच रस्त्यातच प्रसूत झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर अज्ञात महिलांनी तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु रुग्णालयातदेखील सध्या कोणीच नातलग न आल्याने ही माता एकाकीच आहे.

नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील गोदा अंकुश काटकर (30) ही चौथ्यांदा गर्भवती होती. तिला पूर्वीची मुलगी व दोन मुले आहेत. गुरुवारी दुपारी काही कामानिमित्त ती बीडकडे येत होती. रस्त्यातच प्रसव वेदना सुरू झाल्या. म्हणून ती गेवराईजवळ गाडीतून उतरली व पायी चालू लागली. वेदना असह्य झाल्याने ती रस्त्यात थांबली ही बाब शेतात मजुरी करणार्‍या महिलांनी पाहिली आणि त्या या मातेच्या मदतीला धावल्या. महिलांनी साडीचा आडोसा केला व भररस्त्यात गोदाबाईची प्रसूती झाली.

त्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या महिलेने आपले नाव व गाव सांगितले असून माझ्या कुटुंबियांना मी कुठे आहे, याची माहिती नाही, असेही ती म्हणाली. रुग्णालयात सध्या ती एकटीच असून तिच्या शरीरात रक्त खूप कमी असल्याने रुग्णालयातील परिचारिका व सेविकाच नातलग बनून तिची काळजी घेत आहेत. प्रकृती सुधारण्यासाठी तिला दोन पिशव्या रक्त देण्यात आले आहे.
नातलगांपर्यंत माहिती पोहोचवू - ही महिला रुग्णालयात आहे हे तिच्या नातेवाइकांना माहीतच नाही. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या नातेवाइकांपर्यत याबाबत कळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’’ आर. दळवी, परिचारिका, जिल्हा रुग्णालय, बीड.
माणुसकीचे दर्शन - गोदाबाई गुरुवारी रस्त्यात प्रसूती झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली. तिच्याजवळ कोणी नातेवाईक नसल्याने ती एकटीच होती. रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर,परिचारिका व सेविकेने त्या महिलेची खूप सेवा केली. तसेच तिच्या शरीरात रक्त कमी असल्याने तिला तत्काळ दोन रक्तपिशव्याही दिल्या व दोन वेळा जेवणाची चांगली व्यवस्था केली असे घडले रुग्णालयात माणुसकीचे दर्शन.
फक्त गावाचे नाव माहीत - मला फक्त गावाचे नाव शेवगाव असल्याचे आठवते, जिल्हा कोणता हे मात्र मला माहीत नाही. रस्त्यात प्रसूती होत असल्यचे पाहुन काही माहिला माझ्या मदतीला धावल्या. त्यांनी साडीचा आडोसा करून प्रसूती केली. त्यांच्या सहकार्यामुळेच बाळ व मी सुखरूप आहोत.’’ गोदाबाई काटकर, बाळाची आई