आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमी अभिलेख : 25 कोटी कागदपत्रांचे स्कॅनिंग, भूमी अभिलेख विभागाचे संचालक संभाजी कडू पाटील यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मागील दोन वर्षांत २५ कोटी कागदपत्रे स्कॅन करण्यात आली आहेत. येत्या मार्चपर्यंत उर्वरित ५ कोटी कागदपत्रेही स्कॅन करून त्याचा मेटाडेटा तयार करण्यात येणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे जमाबंदी आयुक्त तथा संचालक संभाजी कडू पाटील (पुणे) यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील भूमी अभिलेख विभागातील जमिनीशी संबंधित महत्त्वाची व जुनी कागदपत्रे स्कॅन करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये टिपण, गुणाकार बुक, आकार फोड, कमी-जास्त पत्रके (कजाप), आकारबंद, योजनापत्रक (एकत्रीकरण योजना), शेतपुस्तक, वसलेवार बुक, नकाशे, गावनकाशा, गटनकाशा, कच्चा बुक, शेतवार पत्रक, रिव्हिजन बुक, फोडीटिपण बुक, पोटहिस्सा टिपण बुक, वाजीब-उल अर्ज, पुनर्मोजणी आकारबंद गुणाकार बुक, बंदोबस्त आकारबंद, विस्तारपत्रक याबरोबरच नगर भूमापन संबंधित चौकशी नोंदवही, मिळकत पत्रिका, मालमत्ता नोंदवही, फील्डबुक, नगररचना पुस्तक यासह तहसील कार्यालयाचे जुने सातबारे, फेरफार नोंदवह्या, हक्क नोंदणी रजिस्टर, इनामपत्रक, खासरापत्रक, कोतवाल बुक पंजी, पेरेपत्रक आदी कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. स्कॅनिंगचे काम झाल्यानंतर त्याचा मेटाडेटा तयार करण्यात येणार आहे.

ही कागदपत्रे स्कॅन झाल्यानंतर त्याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही कागदपत्राची शोधाशोध करण्याची गरज भासणार नाही. यामध्ये कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे व जनतेला तत्पर सेवा देता येणार आहे. येत्या जानेवारी, फेब्रुवारीमध्ये विभागाचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात रायगड, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व नागपूर या विभागांच्या सहा जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यात येणार असल्याचे संभाजी कडू पाटील (पुणे) यांनी सांगितले.
जमिनीची पुनर्मोजणी एप्रिल २०१७ नंतर
राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी एप्रिलनंतर करण्यात येणार आहे. हा प्रयोगही सुरुवातीला विभागाच्या सहा जिल्ह्यांत राबवण्यात येणार आहे. त्यानंतर हे काम संपूर्ण राज्यात करण्यात येणार आहे. यापूर्वी जमिनीची मोजणी ही स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९३० पूर्वी झाली होती. ही मोजणी शंकू-साखळीच्या साह्याने झाली होती. आता त्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत म्हणून मोजणी आधुनिक उपकरणाच्या साहाय्याने व सॅटेलाइटचा वापर करून करण्यात येणार आहे. ही मोजणी झाल्यानंतर जमिनीचे क्षेत्र मापन अचूक होणार आहे. असे झाल्यास निश्चितच जमिनीचे वादाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. याबरोबरच वेळ, पैसा वाचणार आहे व जमिनीचा जास्तीत जास्त वापर होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...