आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुखेडमधील लेंडी नदी खळाळली, मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - जिल्ह्याच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात एकूण २९२.२० (सरासरी १८.२६) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मुक्रमाबाद भागात गुरुवारी पहाटे ३ ते सकाळी साडेसहाच्या दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने (६० मि.मी.) कालपर्यंत कोरडी पडलेली लेंडी नदी खळखळून वाहू लागली.

सलग दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाची हजेरी सुरूच आहे. त्यामुळे धर्माबाद तालुक्यातील बाभळी परिसर, नायगाव तालुक्यातील कहाळा परिसरात शेतकऱ्यांनी पेरण्याही सुरू केल्या. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक ४८ मि.मी. पावसाची नोंद धर्माबाद तालुक्यात करण्यात आली. देगलूर येथे ४७ मि.मी. पाऊस झाला, तर बिलोलीत ४५.४० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मुखेड तालुक्यातही ४३.५७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. या वर्षी आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७००.१८ (सरासरी ४३.७६) मि.मी. पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या हा पाऊस ४.५८ टक्के आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्याला दिलासा : पाण्याच्या थेंबही शिल्लक नसलेल्या लेंडी नदीला (ता. मुखेड) गुरुवारी झालेल्या एकाच पावसाने प्रवाहित केले. त्यामुळे मुक्रमाबादसह आजूबाजूच्या अनेक गावांतील लोकांच्या पिण्याचा प्रश्न मिटला.
जलयुक्तच्या कामातही मोठा पाणीसाठा
प्रतिनिधी | लातूर
निलंगा तालुक्यातील अंबुलगा आणि परिसरातील १० गावांमध्ये गुरुवारी सकाळी दोन तास दमदार पाऊस पडला. सुमारे ३० ते ४५ मिलिमीटर पावसाची नोंद या परिसरात झाली अाहे. या पावसामुळे ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारमधून नाला खोलीकरणाची कामे झाली आहेत त्या ठिकाणी मोठा पाणीसाठा झाला आहे.

गुरुवारी सकाळी निलंगा तालुक्यातील अंबुलगा, मदनसुरी, होसूर, हाडगा, निटूर, निलंगा, औराद भागात पाऊस पडला. त्यातील अंबुलगा, मदनसुरी, वलांडी परिसरात दोन तास जोरदार पाऊस पडला आहे, तर निटूर, निलंगा, औराद परिसरात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. दोन तासांमध्ये काही ठिकाणी ३५ तर काही ठिकाणी ४५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या परिसरात दोन दिवसांनंतर पेरण्या होण्याची शक्यता आहे. दरम्यान, औराद शहाजानी येथून गेलेली व गत तीन वर्षांपासून कोरडी असलेली तेरणा नदी मृगाच्या पहिल्या पावसाने खळाळून वाहती झाली. हे दृश्य पाहण्यासाठी औराद शहाजानी येथील नागरिकांनी गर्दी केली होती.

लातूर जिल्ह्यात २४ तासात १४.४९ मी.मी. पाऊस : जिल्ह्यात गत २४ तासात सात तालुक्यांत सरासरी १४.४९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.औसा ०.४३, उदगीर २४.८६, अहमदपूर १.८३ , चाकूर ७.६०, जळकोट २९, निलंगा २५.८८, देवणी ४१.६७, शिरुर अनंतपाळ तालुक्यात १३.६७ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.

सिमेंट बंधारे भरून वाहू लागले
निलंगा तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलयुक्त शिवारच्या कामांना सुरुवात झाली होती. त्या परिसरात गुरुवारी चांगला पाऊस झाला. त्यामुळे निलंगा, अंबुलगा, हाडगा, हलगरा या भागात खोलीकरण केलेल्या नाल्यांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. सिमेंट बंधारे भरून पाणी वाहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बातम्या आणखी आहेत...