आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कडेकोट बंदोबस्तात संजयवर अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - किनवट येथे मंगळवारी पोलिस ठाण्याच्या आवारात जाळून घेणा-या संदीप ऊर्फ संजय पिराजी धोतरे या तरुणाचा उपचारादरम्यान आदिलाबाद येथे मृत्यू झाला. त्याच्यावर बुधवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे. गंगानगरातील महिलांनी केलेल्या तक्रारीवरून किनवटचे पोलिस उपनिरीक्षक विवेकानंद भारती यांना निलंबित केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक परमजितसिंग दहिया यांनी बुधवारी सायंकाळी दिली.

किनवट येथे मंगळवारी झालेल्या घटनेनंतर तणाव निर्माण झाला. त्यात संजयचा मृत्यू झाल्याने तणावात अधिक भर पडली. शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह शहरात आणला तेव्हा सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुरुवातीला शहरातील काही समाजसेवी कार्यकर्ते व नातलगांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला, परंतु जिल्हा पोलिस अधीक्षक परमजितसिंग दहिया यांनी स्वत: त्याच्या घरी जाऊन नातेवाइकांची व इतरांची समजूत काढली. या प्रकरणात पोलिस प्रशासन कोणालाही पाठीशी घालणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी व्हावी म्हणून तपास सीआयडीकडे देण्यात येईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर चोख पोलिस बंदोबस्तात संजयवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अकस्मात मृत्यू दाखल
संजय धोतरेच्या मृत्यूप्रकरणी प्रथम आदिलाबाद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानंतर किनवट पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जाहीर केले. दरम्यान, शहरातील तणाव निवळण्यासाठी पोलिस अधीक्षक दहिया यांनी शांतता कमिटीची सभा घेतली. सभेला आमदार प्रदीप नाईक, माजी खासदार डी. बी. पाटील, माजी नगराध्यक्ष इसा खान, के. मूर्ती, यादवराव नेम्माणीवार, गंगण्णा नेम्माणीवार आदी उपस्थित होते.