आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News About Mayor Seat Reserved For Women, Divya Marathi

महापौरपद ओबीसी महिलेसाठी, राष्ट्रवादीकडे उमेदवारांची मांदियाळी, काँग्रेसही करणार प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी परभणीचे महापौरपद इतर मागासवर्ग प्रवर्गातील (ओबीसी) महिलेसाठी आरक्षित झाले आहे. शनिवारी (दि.16) मुंबईत झालेल्या आरक्षण सोडतीतून हे आरक्षण जाहीर झाले असून यामुळे परभणी महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील सात ओबीसी नगरसेविकांच्या आशा उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी मांदियाळी असताना काँग्रेसमध्येही दोन ते तीन नगरसेविका ओबीसी असल्याने त्यांनाही सत्तापालट करण्याच्या दृष्टीने मोठी अपेक्षा आहे. शिवसेनेकडेही एक सदस्या आहेत. परभणी नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर पहिलेच महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांना पहिले महापौरपद भूषवण्याचा मानही मिळाला. नवीन महापालिका असल्याने व बिकट आर्थिक स्थितीमुळे देशमुख यांच्यासमोर मोठी आव्हाने होती. त्यांनी निधी मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना दीड वर्षानंतर यश आले. राज्य शासनाकडून निधी मिळवण्यात यश आल्याने त्यांच्या अखेरच्या वर्षभराच्या कालावधीत विकासाची कामे मार्गी लागली. विशेषत: मागील चार महिन्यांत शहरात झालेली मुख्य रस्त्यांची कामे दखल घेण्याजोगी ठरली आहेत.

महापौर प्रताप देशमुख यांचा कालावधी येत्या नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने त्यापुढील अडीच वर्षांसाठी महापौरपदाचे आरक्षण शनिवारी मुंबईत जाहीर झाले. महापालिकेत काठावरचे बहुमत असलेली राष्ट्रवादी एक अपक्ष व भाजपच्या दोन सदस्यांच्या साहाय्याने अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आली.

राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसची सदस्यसंख्याही मोठी आहे. त्यामुळे मागची समीकरणे जुळवण्यात राष्ट्रवादीला अपयश आल्यास काँग्रेसही ती समीकरणे जुळवू शकते. परंतु या सर्व बाबींसाठी आगामी विधानसभेची निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विधानसभेची समीकरणेही आगामी महापौरपदासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, अशी शक्यता आहे.

विधानसभेनंतर...
महापौरपदाची निवड नोव्हेंबरअखेरीस वा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वीच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. तरीदेखील महापालिका वर्तुळात महापौरपदाच्या इच्छुक उमेदवारांच्या दृष्टीने चर्चेस सुरुवात झाली आहे.