आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेडमध्ये दमदार पाऊस; पिकांना संजीवनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जालना जिल्ह्यात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून सूर्यदर्शन झालेले नसून पावसाची संततधार कायम आहे. या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना मोठा आधार मिळाला आहेच, शिवाय बहुतांश नद्या-नाले प्रवाहित झाले आहेत. जलयुक्त योजनेतून झालेल्या अनेक बंधाऱ्यांत पाणी साचले आहे.

रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरात पावसाची संततधार सुरू झाली. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. बदनापूर, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी या तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस होत आहे. या वर्षी आतापर्यंत सरासरी १९२ मिमी पाऊस झाला आहे. जालना शहर आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे कुंडलिका नदीला पूर आला, तर रामतीर्थ पुलाजवळील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती बंधारा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ओव्हरफ्लो झाला. बंधाऱ्याच्या भिंतीवरून पाणी वाहत असल्याने अनेक नागरिकांनी भरपावसात येथे गर्दी केली होती.

लातुरात हलका पाऊस
शहर व जिल्ह्यात रविवारीही तुरळक भिजपाऊस झाला. दिवसभर आभाळ ढगाळलेले असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. भलेही या पावसाने जलस्रोतांची तहान भागणार नसली तरी तो पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लातूर शहरात सकाळी काही मिनिटे रिमझिम पाऊस झाला. जिल्ह्यात असेच चित्र होते. सध्या काही भागांत पिके चांगली असून कोळपणी सुरू झाली आहे. वाढती मजुरी लक्षात घेता अनेक जण खुरपणीऐवजी तणांवर तणनाशकांची फवारणी करत आहेत.तथापि, याचा विपरीत परिणाम मातीच्या आरोग्यावर होणार आहे. काहीसा उशिरा पेरा झालेल्या पिकांना पाखरांनी लक्ष्य केले असून ते कोवळ्या पिकांची पाने खात आहेत. चोचीने उगवलेले पीक उखडून त्याखाली असलेले बी ते खात आहेत. हे थांबण्यासाठी मातीचा चिखल व्हावा, अशा मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

हिंगोलीतही सूर्यदर्शन नाही
सलग तिसऱ्या दिवशी जिल्हाभरात मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे सूर्यदर्शन झाले नाही. तीन दिवसांपासून पाऊस होत असला तरी दमदार आणि सलग संततधार होत नसल्याने कयाधू, पैनगंगा या नद्यांना पूर मात्र आला नाही. रविवारी दिवसभर रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पिकांना मानवणारा पाऊस झाला. आज सायंकाळी मात्र त्यात काहीशी वाढ होऊन हिंगोली शहर व परिसरात दमदार पाऊस झाला. पावसात जोर नसल्याने जिल्ह्याच्या मध्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीला मात्र पूर आला नाही. याशिवाय मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पेनगंगा नदीलाही मोठा पूर आला नाही.
१६ कोटी लिटर पाणी बंधाऱ्यात
जालना शहरातील कुंडलिका नदीवर बांधण्यात आलेला बंधारा ओव्हरफ्लो झाला असून त्याची साठवण क्षमता १६ कोटी लिटर इतकी आहे. २०१२-१३ च्या दुष्काळात सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने हा बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाच किलोमीटरच्या बोअरवेल्सना उन्हाळ्यातही पाणी राहते.
नांदेड जिल्ह्यात संततधार
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ४०३.१२ मि.मी. पाऊस झाला. पावसाळी वातावरणामुळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सूर्यदर्शनही दुर्मिळ झाले. शनिवारी दुपारी सुरू झालेला रिमझिम पाऊस रात्रभर व रविवारी दिवसभर सुरू होता. यामुळे जिल्ह्याची सरासरी २८३.४९ मि.मी. पर्यंत झाली. वार्षिक सरासरीच्या हा २९.६७ टक्के आहे.
जायकवाडीत महिनाभरात २३.२७७ दलघमीची वाढ
पैठण - महिनाभरात झालेल्या पावसाच्या पाण्यावर जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २३.२७७ दलघमी पाण्याची वाढ झाली आहे. सध्या आवक ६.२७७ ने होत असली तरी जिवंत पाणीसाठा होण्यासाठी वरील धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा असून जायकवाडीच्या वरील भागातील सर्व धरणे मात्र याच पावसावर पाच टक्क्यांच्या वर गेली आहेत, तर जायकवाडी आजही मृतसाठ्यावरच मराठवाड्याची तहान भागवत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा १४ मार्च रोजी मृतसाठ्यात गेला होता. त्यानंतर या पाण्याचे नियोजन आॅगस्टपर्यंत करण्यात आले आहे. मात्र, यंदा धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाणे गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक असल्याने जायकवाडीचा पाणीसाठा या महिनाभरात जिवंत साठ्यावर येईल, अशी माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...