आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपडे धुणे जिवावर बेतले, चाकूरजवळ तलावात बुडून चौघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - कपडे धुण्यासाठी चाकूरजवळील तलावावर गेलेल्या चार जणांचा रविवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर तीन जणांना वाचवण्यात यश आले. मृतांत 14 ते 18 वयोगटातील तीन युवती आणि एका युवकाचा समावेश आहे. याप्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अफरीन अय्युब शेख (14), सुमय्या अखलाख शेख (18), शकिलाबी चांदपाशा शेख (16, रा. सर्व चाकूर ) आणि अन्सार इस्माईल शेख (14, रा. लातूर), अशी मृतांची नावे आहेत. हे चौघे आणि मुजाहिद अखलाख शेख (12), अल्ताफ चांदपाशा शेख (12) आणि अखिलाबी चांदपाशा शेख (14) हे सात जण घरातील कपडे धुण्यासाठी शहराजवळील तलावावर गेले होते. त्यावेळी मुजाहिद हा पाण्याचा अंदाज घेण्यासाठी तलावात उतरला. परंतु खड्डा लागल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी अल्ताफ पाण्यात उतरला. त्याच्या मदतीमुळे मुजाहिद पाण्याबाहेर आला परंतु अल्ताफ बुडू लागला. त्या वेळी अखिलाबी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरली. त्याच वेळी उर्वरित चौघेही आरडाओरड करत पाण्यात उतरले. त्यांचे ओरडणे ऐकून शेजारील लतीफ महेबूब कोतवाल हे त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी अल्ताफ व अखिलाबीला पाण्याबाहेर काढले. मुजाहिद तर अगोदरच पाण्याबाहेर आला होता. परंतु उर्वरित चौघे बुडाले होते, तरीही कोतवाल यांनी त्या चौघांना पाण्याबाहेर काढले. पण तोपर्यंत त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन मृत्यू झाला होता. दुपारी तीन वाजेच्या सुमारास मृतदेह पाण्यातून काढण्यात आल्यानंतर चाकूरच्या सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले.यातील मृत तिघी चुलत बहिणी असून चौथा हा त्यांच्या आत्याचा मुलगा होता. तो लातूरला राहत असे. उन्हाळी सुट्यांनिमित्त तो मामाच्या गावी आला होता.

लग्नाआधीच मृत्यूने गाठले
मृत सुमय्या हिचे 17 मे रोजी लग्न ठरले होते, तर शकिलाबीला पाहण्यासाठी सोमवारी पाहुणे येणार होते. या सर्वांची आíथक परिस्थिती हलाखीची आहे. सुमय्याचे आईवडील कर्नाटकातील जामखंडी येथे हॉटेलात कामाला आहेत. घटनेनंतर त्यांना ही माहिती देण्यात आली असून ते तेथून आल्यानंतर दफनविधी करण्यात येणार आहे.