आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकमधील शोषणाची माहिती असूनही भारतीय दूतावास गप्प, लातूरच्या तरुणांची आपबीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - इराकमध्ये कामाच्या शोधात गेलेल्यांचे शोषण होते. गरीब तरुणांना जादा पैशांचे आमिष दाखवून एजंट फसवून इराकमध्ये नेतात. तिथे राहायची, खायची कसलीच सुविधा नाही. आम्ही अशिक्षित आहोत. आम्हाला ते माहीत नव्हते. मात्र, तिथल्या दूतावासातील अधिकार्‍यांना हे सगळे ठाऊक आहे; मग भारतातून कामासाठी जाणार्‍यांना सरकार याची कल्पना का देत नाही, असा संतप्त सवाल आहे बालाजी भोसले या तरुणाचा.

इराकमधल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथे दोन- एक हजार कामगार अडकले होते. त्यात लातूर जिल्ह्यातील चार तरुणांचा समावेश होता. सात महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात इराकमध्ये गेलेल्या या चारही तरुणांची सुटका झाली अन् सोमवारी रात्री ते मुंबई विमानतळावर उतरले. मंगळवारी सकाळी ते लातूरला पोहोचले. त्या वेळी त्यांनी इराकमधल्या परिस्थितीचे अंगावर काटा आणणारे वर्णन केले. बालाजी भोसले याने सांगितले की, गावातल्या एजंटाने दर महिन्याला चारशे डॉलर मिळतील म्हणून इराकला जायचे स्वप्न मनात पेरले. इथे वर्षभर काम करून जेवढे पैसे मिळणार नाहीत, तिथे ते महिन्याला मिळतील.

अख्खे आयुष्य इथे घालवण्यापेक्षा वर्ष-दोन वर्षे इराकमध्ये कामे करायची अन् बक्कळ
पैसे घेऊन पुन्हा भारतात यायचे, हे एजंटाने पटवून दिले. त्याला 25 हजार रुपये देऊन आम्ही चौघे जण इराकच्या बसरा शहरातील एका कंपनीत बांधकाम मजूर म्हणून गेलो. राहायला एसी खोल्या, रजा, खायची-प्यायची चंगळ, आजारी पडल्यास सगळा खर्च कंपनीचा अशी एक ना अनेक आश्वासने एजंटाने दिली होती. मात्र, तिथे गेल्यावर सगळेच उलटे निघाले. डिसेंबर 2013 ला आम्ही इराकच्या बसरात पोहोचलो. पहिला महिनाभर तर राहायला खोलीच मिळाली नाही. उघड्यावरच खायचे अन् तिथेच झोपायचे. प्यायला शुद्ध पाणी नाही. जेवायला दिवसाकाठी दोन कप चहा अन् दोन रोटी. 400 ऐवजी 200 डॉलरच पगार देऊ असे सांगितले; पण तोही तीन महिन्यांतून एकदा मिळाला.

गड्या आपला गाव बरा !
घरातील गरिबी दूर करण्यासाठी जादा मेहनतीची तयारी ठेवून आम्ही इराकला गेलो होतो. कितीही काम केले, तरी खेड्यात जास्त पैसे मिळत नाहीत. त्यामुळे काहीतरी करून दाखवण्यासाठी आई-वडील, बायका-मुले मागे ठेवून परदेशात गेलो. तिथून जिवंत परतू असे वाटत नव्हते. आता सुखरूप घरी आलोय. कधी एकदा घरी जावे असे झालेय. पुन्हा म्हणून बाहेर कुठे जाणार नाही. गड्या आपला गाव बरा, हेच खरे.
नितीन कांबळे, इराकमधून परतलेला तरुण


तुझे तो गोली से उडा दूंगा
जादा काही मागितले, तर अरब मॅनेजर सरळ बंदूक काढून छातीवर लावायचा. तुझे तो गोली से उडा दूंगा म्हणायचा. त्यामुळे मुकाट्याने सहन करायचो. पगार मागायचीही हिंमत नव्हती. पासपोर्ट फाडून टाकीन म्हणायचा. तिथल्या दूतावासातील अधिकार्‍यांशीही संपर्क साधता यायचा नाही. ज्यांनी प्रयत्न करून अधिकार्‍यांना माहिती दिली, त्यांनाही फायदा झाला नाही. जास्त बोललो, तर मारहाण केली जायची. ज्ञानेश्वर भोसले, इराकमधून परतलेला तरुण


झाडाची पाने पडावीत, तसा गोळ्यांचा सडा पडायचा
आयुष्यात कधीच बंदूक आणि त्याच्यातील गोळ्या बघितल्या नव्हत्या. बसरात गेल्यावर दररोज सकाळी उठून खोलीच्या बाहेर आल्यावर दररोज किमान 50 गोळ्या पडलेल्या असायच्या. झाडाची पाने पडावीत, तसा गोळ्यांचा सडा पडायचा, असे प्रमोद सोनवणे याने सांगितले.


छायाचित्र - युद्धजन्य परिस्थितीमुळे इराकमध्ये अडकलेले लातूर जिल्ह्यातील तरुण मंगळवारी आपल्या गावी पोहोचले.