आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसदर प्रश्न पेटला : मंत्र्यांसमोर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांचा चोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उसाला एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करावेत, शेतकऱ्यांची सर्वच बिले थकवणाऱ्या बार्शी तालुक्यातील आर्यन शुगर्स कारखान्यावरील कारवाई करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यासाठी गेलेल्या जनहित शेतकरी संघटनेच्या २० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी साेलापुरात साेमवारी लाठीमार केला.
‘शेतकरी पळत असताना त्यांचा पाठलाग केला व त्यांना शाेधून शाेधून मारले. ‘सहकारमंत्र्यांच्या आदेशावरूनच पोलिसांनी हे अमानुष्य कृत्य केले,’ असा अारोप जनहित शेतकरी संघटनेचे प्रमुख प्रभाकर उर्फ भय्या देशमुख यांनी केला.

भाजप कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने सहकारमंत्री चंद्रकांत पाटील साेलापूर शहरात अाले हाेते. जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची अडवली. भय्या देशमुख यांनी पाटील यांना निवेदन दिले आणि त्यांना गाडीतून खाली उतरण्याचा आग्रह केला. त्यावर ‘कारखान्याची सुनावणी झाली अाहे, कारवाई करण्यास वेळ लागेल. तुम्ही निवेदन द्या’, असे मंत्री म्हणाले. त्यावर ‘किती वेळा निवेदन द्यायचे?’ असा प्रतिप्रश्न देशमुख यांनी केला. तेवढ्यात गाडीसमोर बसलेल्या शेतकऱ्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीमार करत १७ जणांना ताब्यात घेतले.

आम्ही गुन्हेगार आहोत काय?
गाडी गेल्यानंतर शेतकऱ्यांनी सहकारमंत्री, मुख्यमंत्री यांच्याविरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा लाठीमार करत शेतकऱ्यांची धरपकड सुरू केली. काही शेतकऱ्यांनी विरोध करत आम्ही काय गुन्हेगार आहोत का? हक्काचे पैसे आम्ही मागितले तर लाठी का चालवता? लोकशाहीत आंदोलन करायचे नाही का? शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा स्थितीत मागण्या मांडण्याचा प्रयत्न करत असताना लाठीमार करता का? आदी प्रश्नांचा भडिमार केला.
भय्या, हे नेहमीचे काय?
ज्या कारखान्याबाबत तुमच्या तक्रारी अाहेत त्यावर आम्ही कारवाई करत अाहोत, याबाबत सुनावणी झाली, कारवाई करण्यास वेळ लागेल, आम्ही कारवाई करत असताना भय्या देशमुख, हे तुमचे नेहमीचे काय? असे म्हणत सहकारमंत्र्यांनी त्यांना खडे बोल सुनावले. त्यावर चिडून जाऊन शेतकऱ्यांनी जाेरजाेरात घाेषणा देत सरकारविराेधी निदर्शने केली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी व अांदाेलकांनी दिली.
आम्ही जमाव पांगवला
^निवेदन देणे, आंदोलन करणे योग्य आहे. पण रस्त्यावर झोपणे, वाहन अडवणे हे योग्य नाही. मंत्र्यांचा वाहनताफा मोकळा करण्यासाठी बळाचा वापर केला.
रवींद्र सेनगावकर, पोलिस आयुक्त
लाठीमार नव्हे, बाजूला केले
^मागण्यांचे निवेदन घेऊन भय्या देशमुख यांनी गाड्यांचा ताफा अडवला. त्यांच्या मागण्या आम्हाला माहीत आहेत. त्यावर चर्चाही सुरू असल्याचे सांगितले. परंतु त्यांनी ऐकले नाही. रस्ता अडवून ठेवला. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना बाजूला केले. शेतकऱ्यांवर लाठीमार झालेलाच नाही.
चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री
लाठीमार निंदनीय
^शेतकरी अापल्या मागण्या मांडण्यासाठी आले असता, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे होते. शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत त्यांना धीर देण्याऐवजी लाठीमार केला हा प्रकार निंदनीय अाहे.
छोटूभाई लोहे, भाजप कार्यकर्ते
सहकारमंत्र्यांनीच आदेश दिले
^सहकारमंत्री माझ्याशी दोन मिनिटे बोलले. त्यानंतर त्यांनी आम्हाला दूर जाण्यास सांगितले. ‘आमचे म्हणणे नीट तरी ऐकून घ्या’, असे अाम्ही म्हणत होतो. तेव्हाच त्यांनी पोलिसांना इशारा केला. ‘अरे, तुमच्या हातात काठ्या आहेत, बघताय काय?' असे सांगून चंद्रकांत पाटील यांनीच पोलिसांना लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या काळात शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. भाजपचे सरकार तर जिवावर उठले आहे.
प्रभाकर देशमुख, जनहित संघटना
बातम्या आणखी आहेत...