आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर-औसा रस्त्याचे कामे अखेर कंपनीकडून काढून घेतले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - गेल्या सहा वर्षांपासून ठेकेदाराच्या बेफिकिरीने रखडलेल्या लातूर-औसा मार्गाच्या चौपदरीकरणाचे व औसा- लामजना या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम अखेर संबंधित कंपनीकडून काढून घेण्याचा निर्णय झाला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी या कामाची फेरनिविदा काढण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत.

औसा - लातूर हा मार्ग महत्त्वाचा असून तो दुपदरी होता. त्याचे महत्त्व व त्यावरून होणारी वाहतूक ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. सन 2007 पासून टेंडर प्रकिया सुरू होऊन 2009 मध्ये कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली होती. 55 कोटींचे काम बीओटीवर पुणे येथील श्री माउली इनफ्रॉस्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले होते. या मार्गावर बुधोडा येथे टोलनाका प्रस्तावित होता. काम दोन ते अडीच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि कंपनीने अर्धवट काम केले. पाच वर्षांत तीनवेळेस खड्डे भरण्यात आले; परंतु रस्ता पूर्ण झाला नाही. विविध संघटनांनी जिल्हाधिका-यांना निवेदने दिली. पालकमंत्री, आमदार व खासदारांपर्यंत हा विषय गेला. साबाने संबंधित कंपनीला काम सुरू करण्याचे कळवले, वेळावेळी स्मरणपत्रे व मुदतवाढीही दिल्या, पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. 30 डिसेंबर 2012 ची मुदतवाढ कंपनीने पाळली नाही. त्यामुळे हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत गेला. यासंदर्भात भुजबळांनी लातूरच्या अधिका-यांची मुंबईत बैठक घेऊन हा विषय जाणून घेतला. त्यानंतर संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करून नवीन कामाची फेरनिविदा काढण्याची सूचना त्यांनी दिल्याचे लातूरच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक बडे यांनी सांगितले. आठ दिवसांत कंपनीला नोटीस बजावण्यात येणार असून कामाच्या फेरनिविदेची प्रक्रिया सुरू करणार असल्याचेही बडे म्हणाले.

देखभाल दुरुस्ती सुरू
* नवीन रस्त्याचे काम सुरू होऊन ते पूर्ण होण्याकरिता एक ते दीड वर्ष लागेल. त्यामुळे आम्ही रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. खड्डे भरण्याचे काम प्रगतीत आहे. यावर 80 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.’’ विवेक बडे, कार्यकारी अभियंता