आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात वाढ, हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने तलाव, नदी- नाल्यांसह सर्वत्र पाणी आहे. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. रब्बी हंगामातील पेरण्या अद्यापही सुरूच असून, नोव्हेंबर अखेरपर्यंत एकूण पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.

अद्यापपर्यंत जिल्ह्यात रब्बीची १०८ टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या राशी अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे सोयाबीनचे रान मोकळे झाल्यानंतर रब्बीचे क्षेत्र आणखी वाढणार आहे. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र एक लाख ७१ हजार ८३० हेक्टर आहे. त्यापैकी एक लाख ८६ हजार ५१० हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. प्रामुख्याने हरभरा, गहू, पांढरी ज्वारी, मका, करडई, जवस, सूर्यफूल आदींची पेरणी झाली आहे.
सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला आहे. त्याचे क्षेत्र ७३ हजार ११०० हेक्टर असताना प्रत्यक्षात एक लाख ३६ हजार ५३० हेक्टरवर हरभराची पेरणी झाली आहे. गव्हाचे क्षेत्र ३५ हजार १८० हेक्टर असताना प्रत्यक्षात पेरणी नऊ हजार ७५३ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. ज्वारीचे क्षेत्र २७ हजार ७८० हेक्टर असताना २६ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. मका तीन हजार २६६ हेक्टर क्षेत्रावर तर करडई आठ हजार ६३४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात आली आहे. जवस, सूर्यफूल व अन्य पिकांचीही पेरणी करण्यात आली आहे.

उसाचे क्षेत्र वाढणार
जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यासाठी बेण्याची तजवीज शेतकरी करू लागले आहेत. शेतकऱ्यांचा फळबागा करण्याकडेही कल वाढला आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत उल्लेखनीय क्षेत्र पेरणी आणि लागवडीखाली येणार आहे.

जिल्हा बँकेकडून कर्ज
यंदा ऐन दिवाळीत हरभरा डाळ दोनशे रुपयांपर्यंत महागल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांनी ऊस लागवडीसाठी बेणे देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच जिल्हा बँकेकडून बिनव्याजी कर्जही देण्यात येणार आहे. त्यामुळे ऊस लागवड वाढणार आहे.
बातम्या आणखी आहेत...