आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहरी निसर्गाचा दगा; लातुरात चार कोटींचे बियाणे पाण्यात !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पुरेसा पाऊस नसताना निसर्गाच्या भरवशावर सोडलेली चाड्यावरील मूठ शेतकर्‍यांच्या अंगलट आली असून 18 हजार 764 हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. ऊन-वार्‍याच्या मार्‍याने राने कोरडी पडली असून कोवळे अंकुर करपत आहेत. रानचारा संपल्याने पक्ष्यांनी अंकुराला टिपणे सुरू केले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात पाच लाख 68 हजार 60 हेक्टर खरिपाचे सरासरी क्षेत्र आहे. मृग नक्षत्रात पेरणी होईल अशी आशा शेतकर्‍यांना होती. तथापि पाऊस झाला नाही. गेल्या आठवड्यात औसा, रेणापूर व लातूर तालुके वगळता अन्य तालुक्यात सलग दोन दिवस पाऊस झाला होता. तो पेरणीयोग्य नव्हता तथापि हलक्या रानावर धान्य उगवण्याइतपत ओल झाली होती. पुढे पाऊस पडेल या भरवशावर लातूर व औसा तालुके वगळता इतर तालुक्यातील शेतकर्‍यांनी पेरणी केली. 17 हजार 416 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली. गळीत धान्य पेरणींतर्गत सोयाबीन 12 हजार 192 हेक्टर्स, 52 भुईमूग, 16 कारळ, 11 तीळ व एक हेक्टर तेवढ्याच क्षेत्रावर इतर गळीत धान्याची पेरणी झाली. तृणधान्यांतर्गत 776 हेक्टर ज्वारी, 54 भात, 165 मका, 27 बाजरी, 36 हेक्टर इतर तृणधान्याची पेरणी झाली. कडधान्यांतर्गत तीन हजार 87 हेक्टर तूर, 354 उडीद व 47 हेक्टरवर मूग पेरण्यात आला.

यासाठी तीन कोटी दोन लाख 40 हजार रुपयांचे सोयाबीन बियाणे, उडीद व मूग 64 लाख, तूर 36 लाख, भूईमुग दोन लाख 45 हजार, तीळ 50 हजार रुपयाचे बियाणे लागले. पेरलेले धान्य उगवल्याने शेतकरी आनंदात होते. आता ते करपत आहे. विशेष म्हणजे पेरणीयोग्य पाऊस झालेल्या शिरुर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील पिकांनाही पावसाने ओढ दिल्याने धोका निर्माण झाला आहे.

घाई अंगलट आली
पेरणीसाठी किमान 70 ते 80 मिमी सलग पाऊस लागतो. लातूर जिल्ह्यात जून महिन्यात 50.68 टक्के पाऊस झाला. देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पेरणीयोग्य पावसाचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांत त्याचे प्रमाण कमी आहे. पुरेशी ओल नसताना शेतकर्‍यांनी पेरणी करावयास नको होती. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन आम्ही वारंवार करीत आहोत. परंतु त्याकडे शेतकर्‍यांनी लक्ष दिले नाही. ही घाई अंगलट आली. - मोहन भिसे, जिल्हा कृषी विकास अधिकारी
(फोटो - साडेअठरा हजार हेक्टरवरील पिकांनी माना टाकल्या)