आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर भाजपमध्ये धुसफूस, दुफळी आली चव्हाट्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर भाजपचे नेते म्हणवून घेणार्‍या संभाजी पाटील निलंगेकर, उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांना आपल्याच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. प्रदेश सरचिटणीस असलेल्या माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघातल्या शिवाजी बिराजदार यांनी बंडाचे निशाण फडकावले, तर उदगीरचे आमदार असलेल्या सुधाकर भालेराव यांना उमेदवारी देऊ नका, असे सांगत उदगीरच्याच कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे लातूरच्या भाजपमधील दुफळी समोर आली आहे. पूर्वी ज्यांना आपले समर्थक म्हणून सांगायचो तीच मंडळी विरोधात गेल्यामुळे नेतेमंडळीही अस्वस्थ झाली आहे.

काँग्रसे पक्षाचे प्राबल्य असलेल्या लातूर जिल्ह्यात मुळातच भाजपची अवस्था बिकट आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये थोडी फार ताकद असलेल्या या पक्षाचा जिल्ह्यात केवळ एकच आमदार आहे. मुंबईत उद्येगात स्थिरावलेले सुधाकर भालेराव गोपीनाथ मुंडेंच्या मदतीने गेल्या वेळी उदगीर या राखीव मतदारसंघातून आमदार झाले. मात्र, पुढे त्यांनी मुंडेंची साथ सोडली. नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर भालेराव त्यांच्या गोटात सामील झाले. लोकसभेलाही त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आणि ऐनवेळी मागे घेतले. त्यामुळे मुंडेसमर्थक भालेरावांवर चांगलेच नाराज आहेत.

रविवारी पक्षनिरीक्षक मुलाखती घेत असताना 200 कार्यकर्त्यांनी भालेरावांच्या विरोधात घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले. शेवटी पक्षनिरीक्षकांना बाहेर येऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागले. हाच प्रकार पक्षाचे सरटिणीस असलेल्या निलंग्याच्या माजी आमदार संभाजी पाटील यांच्याबाबतही घडला. त्यांच्या विरोधात तर शिरूर अनंतपाळच्या शिवाजी बिराजदार यांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. बिराजदार यांनी कोणत्याही परिस्थितीत मागे न हटण्याचा पण केला आहे. निवडणुकांचा बिगूल वाजलेला नसतानाच या कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात आणखी काय पाहावे लागणार आहे, याचा अंदाज भाजपचे कार्यकर्ते घेत आहेत.

भाजप दुभंगली
जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, संभाजी पाटील निलंगेकर, सुधाकर भालेराव असा एक गट पडला आहे. दुसरीकडे ग्रामीणचे इच्छुक रमेश कराड, लातूर शहराध्यक्ष सुधीर धुत्तेक र असा दुसरा गट आहे. विद्यमान खासदार सुनील गायकवाड पूर्वी या निलंगेकर गटात होते. मात्र, ते अंतर ठेवून आहेत.

भाजपचा नगरसेवक नाही, आमदारकी हवी
लातूर शहर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. शिवसेनेचे पप्पू कुलकर्णी यांचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सोडावा, अशी मागणी करीत पाच ते सहा जणांनी मुलाखती दिल्या. मात्र, 70 नगरसेवकांच्या लातूर महापालिकेत भाजपचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. मग भाजपची ताकद नेमकी कोठे आहे, हा बिनीचा प्रश्न आहे.

अस्वस्थ नेते मौनात
कार्यकर्त्यांच्या ताठर भूमिकेमुळे निलंगेकर, भालेराव ही मंडळी अस्वस्थ आहे. त्यांनी माध्यमांकडेही आपले मन मोकळे केले नाही. निरीक्षकांसमोर घेतलेल्या भूमिकेमुळे सगळेच अचंबित झाले. ठिय्या आंदोलनाचे प्रकार तर कुठेच झाले नसल्याचे पक्षनिरीक्षक म्हणाले.