आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीसाठी उदगीरमधून आले इन मिन साडेतीन कार्यकर्ते !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने गेल्या वेळेस पराभूत झालेल्या सुनील गायकवाड यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे स्पर्धेत असलेले उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव आणि हेरचे माजी आमदार टी. पी. कांबळे कमालीचे नाराज आहेत. त्यातूनच सोमवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उदगीरमधून केवळ तीनच कार्यकर्ते उपस्थित राहिले. परिणामी गायकवाड यांना अगोदर पक्षाअंतर्गत गटबाजी आणि नंतर विरोधकांचा सामना करावा लागणार असल्याचे दिसते.

लातूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार ठरवण्याचा निर्णय घेताना पक्षर्शेष्ठींची चांगलीच दमछाक झाली. राखीव असलेल्या या मतदारसंघातून मोठी चुरस निर्माण झाली होती. सुनील गायकवाड यांचे नाव चार महिन्यांपूर्वी एका बलात्कार प्रकरणात आले होते. त्यामुळे ते स्पर्धेतून बाद झाले होते. उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव, टी. पी. कांबळे, अँड. सुरेंद्र घोडजकर यांची नावे आघाडीवर होती. भालेराव यांनी गडकरींमार्फत, तर कांबळे यांनी मुंडे यांच्या मध्यस्थीने फील्डिंग लावली होती. या दोन्ही गटांमधील स्पर्धा टोकाला गेल्यामुळे र्शेष्ठींनी पुन्हा एकदा गायकवाड यांना उमेदवारी बहाल केल्याचे रविवारी रात्री घोषित केले. मात्र, यामुळे गटबाजी संपलेली नसल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळी शिवाजी चौकामध्ये भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले, मात्र खुद्द उमेदवार सुनील गायकवाड यांचीच तेथे गैरहजेरी होती. त्यानंतर भालचंद्र ब्लड बँकेत प्रदेश महामंत्री रवींद्र भुसारी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. लोहा-कंधारमधून 20 कार्यकर्ते याला उपस्थित होते. मात्र, उदगीरमधून केवळ तीनच कार्यकर्ते हजर होते. तेही अगदीच नवखे.

भालेराव राहणार फटकून
सुनील गायकवाड यांना तिकीट दिल्यामुळे उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव नाराज झाले आहेत. त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो. विशेष म्हणजे कालपर्यंत त्यांच्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगणारे माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर सोमवारी सुनील गायकवाड यांच्याशी कानगोष्टी करताना दिसले.

मुंडे गटाची अनुपस्थिती
या कार्यक्रमाला माजी आमदार गोविंद केंद्रे, रमेश कराड, टी. पी. कांबळे यांची अनुपस्थिती होती. तसेच तिकीट मिळवण्याच्या स्पर्धेत अपयशी ठरलेले आमदार सुधाकर भालेराव यांचीही अनुपस्थिती खटकणारी होती. ते अजूनही मुंबईत असल्याचे सांगण्यात आले, तर गोविंद केंद्रे यांच्या एका नातेवाइकाचे निधन झाल्यामुळे सगळे जण तिकडे गेल्याचे सांगण्यात आले.