आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत रुग्णाला मृत ठरवले; कारवाई नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जिवंत रुग्णाला मृत घोषित करून त्याला शवविच्छेदनासाठी नेण्याच्या प्रकारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कोणालाच जबाबदार धरलेले नाही. तो प्रकार चुकून घडल्याचे पत्र पोलिसांना देऊन यापूर्वी रुग्णाच्या आकस्मिक मृत्यूचे पत्र रद्द समजावे,असे सांगण्यात आले. तो प्रकार चुकून झाल्याचा उल्लेख आजच्या पत्रात करण्यात आला आहे.

लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गलथान कारभारामुळे हिरालाल पतिलिया या अमरावतीच्या गृहस्थाला जीव गमावण्याची वेळ आली होती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. अपघातात जखमी झालेल्या हिरालाल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर त्यांना शवविच्छेदन कक्षाकडे नेले जात असतानाच बेशुद्ध असलेले हिरालाल जागे झाले. या प्रकारामुळे एकच गहजब उडाला. मात्र, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनी अत्यंत रुक्षतेने हे प्रकरण हाताळले. असला काही प्रकार घडल्याचे माहितीच नसल्याचा पवित्रा डोणगावकर यांनी घेतला. तो तसाच पुढे चालू ठेवत त्यांनी दुसर्‍या दिवशीही या प्रकरणी कोणाही कर्मचार्‍याला जबाबदार धरून कारवाई केली नाही. उलट पोलिसांना पत्र देण्याचा सोपस्कार उरकण्यात आला. शिकाऊ डॉक्टराच्या चुकीमुळे जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्यात आले होते. आता हा रुग्ण जिवंत असल्याचे आढळल्यामुळे पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे दिलेले पत्र रद्द समजावे, असे नव्या पत्रात म्हटले आहे.