आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई रेल्वेगाडी लातूरसाठी कायम ठेवावी यामागणी साठी बंदाचा हाक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - मुंबई-लातूर रेल्वेगाडी नांदेडपर्यंत सोडण्याऐवजी ती लातूरसाठीच कायम ठेवावी यासह अन्य मागण्यांसाठी लातूर रेल्वे बचाव समितीने बुधवारी पुकारलेल्या दुपारपर्यंतच्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
लातूर-मुंबई गाडी नांदेडपर्यंत सोडण्याची घोषणा रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी केल्याने त्याला तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्यातूनच लातूर रेल्वे बचाव समितीची स्थापना झाली असून त्याला सगळेच राजकीय पक्ष, विविध सामाजिक आणि व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. परिणामी आजचा बंद यशस्वी ठरला. तत्पूर्वी विविध पक्षांचे नेते, नगरसेवक, व्यापारी, संघटनांनी सकाळी गंजगोलाई ते गांधी चौक अशी फेरी काढली. त्यानंतर गांधी चौकात सभा झाली. 9 मार्च रोजी पंढरपूर-निझामाबाद रेल्वे रोखून आंदोलन करण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.


बंदमध्ये सर्वांचाच पुढाकार : महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, स्थायी समितीचे सभापती अ‍ॅड. समद पटेल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष सुधीर धुत्तेकर, अशोक गोविंदपूरकर, रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत चिकटे, अ‍ॅड. अण्णाराव पाटील, संतोष गिल्डा, अ‍ॅड. उदय गवारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बसवराज वळसंगे, सचिव दिनेश गिल्डा आदीनी बंदमध्ये पुढाकार घेतला.
संघर्ष समितीच्या मागण्या
*मुंबई- लातूर रेल्वेगाडी कायम ठेवावी
*हैदराबाद-पुणे गाडी आठवड्यातून तीन दिवसांऐवजी दररोज सोडावी.
*कोल्हापूर-नागपूर रेल्वे आठवड्यातून दोनऐवजी चार दिवस सोडावी.
*लातूर-पुणे शटल सुरू करावी.
*लातूर व उस्मानाबाद स्थानकावर दादरा, कँटीन, विश्रामगृह आदी सुविधा द्याव्यात.
*लातूर ते तिरुपती गाडी सुरू करावी.
*विशाखापट्टणम- नांदेड रेल्वे लातूरपर्यंत आणावी.