लातूर - लातूर पॅटर्नसाठी प्रसिद्ध असलेल्या मोटेगावकर यांच्या रेणुकाई केमिस्ट्री कोचिंग क्लासेसमध्ये गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता सर्व्हिस टॅक्सच्या वसुलीसाठी गेलेल्या औरंगाबादच्या केंद्रीय सीमा, उत्पादन तथा सेवा शुल्क विभागाच्या पथकावर संचालक-विद्यार्थ्यांनी हल्ला केला. खाकी वर्दीत असलेल्या अधिकार्यांना मारण्याबरोबरच त्यांच्या निळा दिवा असलेल्या गाड्यांवर अंडी आणि दगड फेकण्यात आले. यामुळे लातूरच्या शैक्षणिक वतरुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रा. शिवराज मोटेगावकरसह दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लातूरच्या उद्योग भवन परिसरात मोटेगावकर यांचे रेणुकाई केमिस्ट्री कोचिंग क्लासेस आहे. केवळ 11 वी आणि 12 वी रसायनशास्त्र हा विषय शिकवणार्या या क्लासेसवर गुरुवारी सकाळी सात वाजता औरंगाबादच्या केंद्रीय सेवा शुल्क विभागाच्या पथकाने सहायक आयुक्त मल्लिनाथ जेउरे यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकली. वर्ग सुरू असल्यामुळे जेउरे यांनी प्रा. मोटेगावकर यांना वर्गाबाहेर बोलावून सर्च वॉरंट दाखवून धाडीची कल्पना दिली आणि सर्व कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यास सांगितले. वर्ग संपल्यानंतर विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी जेउरे यांचे अधीक्षक एल. बी कुरुळे, निरीक्षक डी. पी. रामेगावकर, एस. बी. जगताप आणि एस. एन. बनसोडे यांनी वर्गात प्रवेश केला. सर्व विद्यार्थ्यांना धाडीची कल्पना देऊन शांततेत वर्गाबाहेर पडण्याचे आवाहन केले. तपासणी पथकाला वर्गात हजर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि कागदपत्रांवर असलेली संख्या पडताळून पाहायची होती. ते काम सुरू असताना अचानक मोटेगावकर यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांनी विद्यार्थ्यांना यांच्यामुळे क्लास बंद पडत आहे, ट्यूशन नीट होत नाही असे सांगून चिथावणी दिली. त्यामुळे चार-पाच विद्यार्थ्यांनी पुढे येऊन अधिकार्यांना मारहाण सुरू केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अधिकारी गांगरले. विशेष म्हणजे पथकातील अधिकारी वर्दीमध्ये होते. आणि ते निळा दिवा असलेल्या सरकारी गाड्यांमधून गेले होते. काही विद्यार्थ्यांनी गाडीवरही दगडफेक केली. तसेच काहींनी अंडी फेकली. मोटेगावकर यांच्या एका बॅचमध्ये किमान 700 विद्यार्थी असतात. त्याचा क्लास असलेल्या परिसरात यामुळे गोंधळ उडाला.
गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी केली टाळाटाळ
प्रारंभीचा गोंधळ झाल्यानंतर पथकातील अधिकार्यांनी आपली सुटका करून घेतली. वरिष्ठांशी बोलून शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, मोटेगावकर यांचे राजकीय पक्षांशी संबंध असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस निरीक्षक डी.डी. शिंदे यांनी टाळाटाळ सुरू केली. सकाळी नऊ वाजता तक्रार देऊनही गुन्हा दाखल होण्यास सायंकाळचे पाच वाजले. पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे आणि निरीक्षक डी.डी. शिंदे कायद्याचा कीस पाडत सरकारी कामात अडथळा होऊ शकत नसल्याचे सांगत होते. मात्र नंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
असे काहीच घडले नाही
- सेवा शुल्क विभागाच्या अधिकार्यांचे पथक आल्यानंतर त्यांना कागदपत्रे उपलब्ध करून दिली. त्यांच्यावर आम्ही हल्ला केलेला नाही. रस्त्यावर त्यांच्या गाडीला कोणी काय केले याची मला माहिती नाही. गेल्या आर्थिक वर्षात 12.33 टक्के दराने आपण 30 लाख रुपयांचे सेवा शुल्क भरले आहे. प्रा. शिवराज मोटेगावकर, संचालक, रेणुकाई क्लासेस
प्राध्यापक, विद्यार्थी ताब्यात
रेणुकाई केमिस्ट्री कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर आणि नऊ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील प्राध्यापकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित फरार आहेत.