आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर : ...तर विधानसभेलाही पराभव पक्का, कव्हेकरांचा काँग्रेसला घरचा आहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - विलासरावांच्या पश्चात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला लातूरमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. मोदींंच्या लाटेत सगळीकडे पडझड झाली असली, तरी लातूरसारख्या ठिकाणी झालेला पराभव सहजपणे घेण्यासारखा नाही. लातूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवाकर पिछाडीवर राहिला. हीच परिस्थिती राहिली तर लोकसभेसारखा पराभव विधानसभेलाही पाहायला मिळू शकतो, असे मत माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले.

काँग्रेसमध्ये असलेल्या कव्हेकरांनी शहर आणि ग्रामीण मतदारसंघातील आपल्या समर्थकांची वेगळी चिंतन बैठक बुधवारी बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती प्रतिभाताई पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत सोट याची उपस्थिती होती. कव्हेकर यांच्या 30 ते 40 समर्थकांची या वेळी भाषणे झाली. लातूर लोकसभेला काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्याच्या कारणांचा पाढा वाचण्यात आला. काँग्रेसने पक्षाची धोरणे योग्यपणे लोकांपर्यंत पोहोचवली नाहीत. त्यामुळे लोक पक्षापासून दूर गेले. स्थानिक नेतृत्वाने सगळ्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे प्रमुख कार्यकर्तेच दिशाहीन होते. अशी भूमिका मांडण्यात आली. कव्हेकरांच्या काही कट्टर समर्थकांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याची भावना व्यक्त केली. समारोपाच्या भाषणात शिवाजीराव पाटील यांनी पक्षाप्रती निष्ठा आहे मात्र पक्षाने न्याय द्यायला हवा, असे मत मांडले. पक्ष मागे राहिला नाही आणि स्थानिक नेतृत्वाची परिस्थिती बदलली नाही तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही पराभवाला सामारे जावे लागेल, असे ते म्हणाले.

त्यांनी 1995 मध्ये विलासरावांचा पराभव करून निवडून आल्यानंतर केलेल्या कामाचा पाढा वाचला. लातूरमधील स्टेडियम, पिण्याच्या पाण्याची 127 कोटींची योजना, कृषि उत्पन्न बाजार समितीमधून विकासकामे आपल्याच काळात झाल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेची मागणी नसतानाही मंजुरी मिळाली. त्यामुळे कर वाढले, एलबीटी लागू झाली. त्यामुळे व्यापारी नाराज झाले. शहरात कचरा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आपण केवळ 15 दिवसांत हे प्रश्न सोडवू शकतो. स्थानिक नेतृत्वाला लोकांच्या भावनांची कदर नसल्यामुळे प्रश्न रखडत पडल्याचे त्यांनी सांगितले.
कव्हेकरांनी अपक्ष थांबावे
शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर ग्रामीणमधून विधानसभेला काँग्रेसकडून तिकिटाची मागणी करावी. मात्र, तिकीट मिळाले नाही तरी अपक्ष निवडणूक लढवावी. तिकीट मिळाले नाही म्हणून गेल्यावेळेसारखी माघार घेतली तर आमदारकीची संधी याही वेळेस हातातून निघून जाईल, असे मत शरद देशमुख या कार्यकर्त्याने व्यक्त केले, तर रेणापूर येथील आबासाहेब पाटील यांनी अपक्ष थांबून विजय मिळत नसतो, शक्ती खर्ची पडते. त्यामुळेही काहीही करून काँग्रेसचे तिकीट आणायचेच असा आग्रह धरला.

काँग्रेसचा संबंध नाही
काँग्रेस पक्षाची प्रदेश पातळीवर बैठक झाली आहे. जिल्हानिहाय किंवा विधानसभानिहाय बैठका घेण्याच्या सूचना नाहीत. कव्हेकरांनी बोलावलेल्या बैठकीची माहिती नाही. तशी ती बोलावली असल्यास काँग्रेस पक्षाचा संबंध नाही. -अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस