आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील सुगावच्या नामदेव शेळके या शेतकऱ्याने सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. पावसाळ्याला दीड महिना उलटल्यानंतरही पाऊस पडत नसल्यामुळे दुष्काळाची तीव्रता गडद होत चालली आहे. गेल्या वर्षी लातूर जिल्ह्यात सुमारे ४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. यावर्षी अद्याप पाऊस पडलेला नाही. दररोज कडक ऊन पडत असल्यामुळे जनावरांना पाणी आणि चारा कसा उपलब्ध करायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. त्यातच पावसाने दगा दिल्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम हातातून गेला आहे.
काही शेतकऱ्यांनी जवळचे होते नव्हते ते विकून पेरण्या केल्या. मात्र, दीड महिन्यापासून पाऊस पडला नसल्यामुळे उगवलेले अंकुर डोळ्यादेखत सुकत आहेत. ही स्थिती पाहावत नसल्यामुळेच नामदेव शेळके या शेतकऱ्याने सोमवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेळके यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन भाऊ आणि एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, शेळके यांना किती शेती आहे, त्यांच्यावर कुण्या बँकेचे कर्ज आहे का? याची माहिती घेतली जात असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तलाठ्यांना गावात जाऊन प्रत्यक्ष माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.