आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवास पॅटर्नच्या भरवशावर शेतकऱ्याने केली पेरणी, पहिल्याच पावसात साठले ७५ लाख लिटर पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्ह्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. मात्र, लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील तळणी गावच्या एका शेतकऱ्याने मात्र आपल्या पेरण्या उरकल्या आहेत. कारण, मध्य प्रदेशातील देवासच्या धर्तीवर त्यांच्या शेतात तयार केलेल्या तळ्यात पहिल्याच पावसात ७५ लाख लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. त्या जलसाठ्याच्या भरवशावर पावसाने कितीही ओढ दिली तरी पुढच्या चार महिन्यांत खरिपाचे पीक घ्यायला त्यांना आता अडचण येणार नाही.
पाऊस आणि पाण्याच्या चिंतेत असलेले शेतकरी काहीतरी मार्ग काढण्याच्या प्रयत्नात होते. लातूर जिल्ह्यातील तळणीचे तुकाराम येलाले हे शेतकरीही त्यातलेच एक. द्राक्ष उत्पादक, निर्यातदार असलेल्या तुकाराम येलालेंना मधल्या काळात द्राक्षाच्या निर्यातीत नुकसान सोसावे लागले. त्यातच त्यांना मध्य प्रदेशातील देवास परिसरामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही तिथल्या शेतकऱ्यांनी शेततळ्यांच्या माध्यमातून शेती पिकवल्याची माहिती कळाली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी काही शेतकरी मित्रांसह देवास गाठले. तेथे शेततळ्याच्या माध्यमातून आपल्याच शेतात पडणारा पाऊस साठवला आणि आपल्याच जमिनीत मुरवल्याचे चित्र त्यांनी पाहिले. त्याच्याच जोरावर तिथला शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळी पिके घेऊन समृद्ध झाल्याचे पाहतानाच त्यांच्या मनात आपल्याही शेतात असा प्रयोग करून बघण्याची कल्पना आली. तेथून परतल्यानंतर येलाले यांनी आपल्या शेताचा भौगोलिक अभ्यास करून उतार शोधून काढला. सगळ्या शेतातील पाणी ज्या नाल्यातून वाहत बाहेर पडते त्याच्या कडेला त्यांनी १५० लांब, ७३ फूट रुंद आणि २२ फूट खोल शेततळे खोदले. नाल्याचा प्रवाह या तळ्याकडे वळवला. दुसऱ्या बाजूने तळे भरल्यावर ओसंडून वाहणारा प्रवाह पुन्हा नाल्यातच जाईल याची काळजी घेतली. ते पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच ८, १० जून रोजी रेणापूर तालुक्यात पाऊस झाला. येलाले यांच्या तळणी गावाचाही त्यात समावेश होता. पहिल्याच पावसात येलालेंचे शेततळे पूर्ण क्षमतेने भरले ७५ लाख लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला.या जलसाठ्याच्या भरवशावर त्यांनी पेरणी केली.
काय आहे तळ्याचा देवास पॅटर्न ?
मध्यप्रदेशातील देवासमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेताच्या १० टक्के हिश्श्यावर छोटे-मोठे शेततळे खोदले आहे. पावसाचे पाणी शेतातून बाहेर पडल्यानंतर ते नाल्याद्वारे नदीकडे जाते. नाल्याच्या शेजारीच तळे खोदून नाल्याचा प्रवाह शेततळ्याकडे फिरवायचा. तळे भरल्यानंतर त्यातून ओव्हरफ्लो होणारे पाणी दुसऱ्या बाजूने पुन्हा नाल्यात सोडून द्यायचे. शिवारातील प्रत्येक शेतकऱ्याने हा प्रयोग केल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया सुरू होते. रिकामे झालेले तळे पुन्हा पुढच्या पावसाने भरत राहते. तो जलसाठा जानेवारीपर्यंत टिकतो. त्यानंतर जमिनीतील पाणी उपशावर पिके तग धरतात.