आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर, हिंगोली, उस्मानाबादेत गारपीटसह अवकाळी पाऊस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लातूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कुठे दहा मिनिटे, तर कुठे अर्धा तास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. या बेमोसमी पावसात काही ठिकाणी गारपीटही झाली. 
 
लातूरसह रेणापूर, औसा, देवणी, शिरूर अनंतपाळ, उदगीर, चाकूर, अहमदपूर आदी तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्यामुळे द्राक्षे आणि अांब्यांचे नुकसान झाले. काही ठिकाणी हरभरा, ज्वारी व गव्हाच्या राशी सुरू असल्याने तयार झालेला माल झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. जनावरांचा चारा भिजू नये म्हणून  पशुपालकांना कसरत करावी लागली. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले. लातूर, उदगीरसह अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. परंतु ऊस, उन्हाळी भुईमूग आदी पिकांना मात्र अचानक आलेल्या या पावसाचा फायदा झाला. थंड वारे सुटल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
 
 वीज पडून घोडा ठार
उस्मानाबाद| जिल्ह्यातील विविध भागांत शनिवारी सायंकाळी अवकाळी पाऊस हाेऊन द्राक्ष, अंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उस्मानाबाद तालुक्यातील कसबेतडवळे येथे वीज पडून भागवत सोपान होगले यांचा घोडा आणि शेळी ठार झाली.
 
हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी
हिंगोली| शहर व परिसरात शनिवारी रात्री ९ च्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला.  सकाळपासूनच हवामानात बदल दिसून येत होता. दुपारनंतर थोडेफार ढगाळ हवामान झाले आणि रात्री पाऊस झाला. शहरासह सेनगाव, नरसी नामदेव, लिंबाळा, कनेरगाव नाका, एमआयडीसी आदी भागांत पाऊस झाला. हवामान बदलामुळे जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता कमी होऊन आजचे कमाल तापमान ३९ अंशांवर आले होते.
 
बातम्या आणखी आहेत...