आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात उपहासात्मक टिकेची परंपरा कायम, मिरवणुकीत स्थानिक राजकारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर -गणेश विसर्जन मिरवणुकीत स्थानिक राजकारण आणि समस्यांवर उपहासात्मक टीका करण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. लातूरचा पाणीप्रश्न, आमदारांचे दुर्लक्ष, महापौरांचे वादग्रस्त वक्तव्य, दुष्काळाची अगतिकता आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवर प्रबोधन करणारे, ओरखडे ओढणारे पोस्टर रविवारच्या मिरवणुकीत लक्षवेधी ठरले.
लातूर शहरातील गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत स्थानिक राजकारणांवर होणारी उपहासात्मक टीका-टिप्पणी कायम लातूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार टोलेबाजी झाली होती. यावर्षीही ती परंपरा कायम राहिली. त्यात विषय गाजला तो पाण्याचा. शहराला सध्या वीस दिवसांआड पाणी येत अाहे. गेल्या वर्षी आमदार अमित देशमुखांनी विधानसभा निवडणुकीत शहरासाठी लिंबोटी धरणातून पाणी आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर आमदारांची निवडणुकीत होती वाणी, देणार होतात आम्हास लिंबोटीचे पाणी'असे टीका करणारे पोस्टर एका गणेश मंडळाने लावले होते, तर दुसऱ्या मंडळाने विलासरावांच्या मृत्यूचा संबंध जोडत थेट जिव्हारी लागणारा वार केला. राजा गेला राजकुमार आले, लातूरकरांचे आज बेहाल झाले' हे पोस्टर चर्चेचा विषय ठरले.
महापौरांवर काही महिन्यांपूर्वी निष्क्रिय असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर त्यांनी आपण पाच पोरांचा बाप असून निष्क्रिय कसे? असा सवाल केला होता. त्यावर महापौर शब्द विभक्त करून मी महा पोरं, मला चार-पाच पोरं' असा उल्लेख असलेले एका मंडळाने रंगवले होते.

मध्यवर्ती गणेश मंडळाने लातूरची ही स्वप्न कधी पूर्ण होणार असा मथळा देऊन सहा प्रश्न उपस्थित केले होते. त्यात बस, पाणी कधी मिळणार, वाहतूक कोंडी कधी फुटणार, स्वच्छता कधी होणार, सुशिक्षित-सुंस्कृत महापौर कधी मिळणार, आमदारांना लातूरचे प्रश्न कधी कळणार? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
मिरवणूक गाजली
लातूर शहरात वीस दिवसांआड मिळणारे पाणी मिरवणुकीत प्राधान्याने दिसून आले. जलपुनर्भरण काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. सांगा कसं जगायचं, नळाला पाणी सुटत नाही, टँकरही बंद झाले' अशी अक्षरे रेखाटलेले बॅनर जागोजागी लावण्यात आले होते. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी करणारे पोस्टर लक्षवेधी ठरले.