आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंगेकर-देशमुखांच्या टोलेबाजीने गाजले ग्रंथालय संघाचे अधिवेशन; टोले-प्रतिटोल्यांचे फटाके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या सोमवारी लातूरमध्ये झालेल्या राज्य अधिवेशनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुखांनी एकमेकांवर टोलेबाजी केली. ते एका व्यासपीठावर येतील असे नियोजन होते. मात्र आमदार अमित देशमुखांनी एकत्र येण्याचे टाळले. पालकमंत्री निघून गेल्यावर ते कार्यक्रमस्थळी आले. एकमेकांच्या अनुपस्थितीत त्यांनी परस्परांवर शेरेबाजी केली. 
    
ग्रंथालय संघ अधिवेशनाच्या उद््घाटन कार्यक्रमाला स्थानिक आमदार अमित देशमुखांसह स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचा उल्लेख करीत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुस्तकांना कोणताही ‘पक्ष’ नसतो असा टोला लगावला. अधिवेशन कार्यक्रमातून पालकमंत्री निघून गेल्यावर अमित देशमुखांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हजेरी लावली.  
  
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांनी मधल्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा आणि महापालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यातून हिसकावून घेतल्या. त्यामुळे  देशमुख-निलंगेकर संघर्ष वाढीस लागला. एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. त्यातच महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे सोमवारी लातूरमध्ये अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद््घाटन सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख या दोघांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यानिमित्ताने निलंगेकर-देशमुख पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार होते. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री आले नाहीत. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उद््घाटनाला आले, परंतु शहरात असूनही आमदार अमित देशमुख उद्््घाटनाला आले नाहीत. तो धागा पकडत निलंगेकरांनी अमित देशमुखांना चिमटे काढले. हा ग्रंथालय संघाचा कार्यक्रम आहे. पुस्तकांचा कार्यक्रम आहे. पुस्तकांना जात, धर्म आणि विशेष म्हणजे राजकीय पक्ष असत नाही. त्यामुळे पुस्तकांच्या कार्यक्रमाला राजकीय चष्म्यातून पाहणे योग्य नाही. गावात राहूनही काही लोक आले नाहीत, असे सांगत त्यांनी नाव न घेता देशमुखांना टोले लगावले.    

निलंगेकर जाताच देशमुख प्रकटले   
ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाचे उद््घाटन करून निलंगेकर गेल्यानंतर अवघ्या १० मिनिटांमध्ये आमदार अमित देशमुख कार्यक्रमस्थळी आले. त्या वेळी एका परिसंवादाला सुरुवात झाली होती. तो ऐकून अमित देशमुखांनी  मनोगत व्यक्त केले.  मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम टाळायला नको होता. राज्यभरातून आलेले लोक त्यांची वाट पाहत होते. काहीतरी घोषणा अपेक्षित होती. मात्र मुख्यमंत्री आले नाहीत. त्यांचा संदेश पालकमंत्र्यांनी वाचून दाखवला. यानिमित्ताने का होईना निलंगेकरांनी काहीतरी ‘वाचन’ केले हे चांगले झाले. या ठिकाणी १०० टक्के राजकारण नसते तर त्यांच्या अगोदर मी येऊन थांबलो असतो, असे म्हणत अमित देशमुखांनी प्रतिटोले लगावले.
बातम्या आणखी आहेत...