आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या ‘प्रायमरी’त लॉबिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रायमरीद्वारे निवडण्यात आलेला उमेदवार आमदार अमित देशमुख व त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांनी लॉबिंग करून निवडून आणला. त्यामुळे ही निवड रद्द करावी, अशी मागणी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली आहे, अशी माहिती पराभूत उमेदवार मोहन माने यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. मागणी मान्य न झाल्यास दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याबरोबरच प्रसंगी आत्महदनही करण्याचा इशाराही दिल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्या निर्णयानुसार लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार ठरवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे 13 मार्च रोजी मतदान घेण्यात आले होते. त्यासाठी सात उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी झेडपीचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांना 760 तर मोहन माने यांना 80 मते मिळाली होती. या निवडप्रक्रियेवर आक्षेप घेत माने म्हणाले, प्रचारादरम्यान बनसोडे यांना निवडून आणण्यासाठी आमदार अमित देशमुख यांच्या नावाचा वापर करीत त्याच्या समर्थकांनी मतदारांवर दबाव आणला होता. तसे आपणाला कळाले होते. यावरून आपण बाभळगावी जाऊन आमदार देशमुख यांना याबाबत सांगितलेही होते. शिवाय, अशी लॉबिंग होत असेल तर आपण माघार घेऊ, असेही त्यांना म्हणालो होतो. त्यावर आमदार देशमुख यांनी असे काही होणार नाही, आपण आपला प्रचार करावा, असा सल्ला दिला होता, असेही माने यांनी स्पष्ट केले. मुळातच मतदारयादी आक्षेपार्ह होती. शिवाय बनसोडे यांना विजयी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला 25 हजार रुपये दिल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्यापेक्षा इतर कोणीही मोठे होऊ नये, अशी संबंधित नेत्याची भूमिका असून त्यांच्या या कृत्यामुळे राहुल गांधी यांच्या विचाराला ठेच पोहोचली आहे. 26 मार्चपर्यंत निर्णयाची वाट पाहणार असून त्यानंतर कोणताही निर्णय घेण्यास आपण मोकळे असल्याचे त्यांनी सांगितले.

बनसोडे केवळ सह्याजीराव
आपल्या आदेशाचे पालन करणारा उमेदवार आमदार देशमुख यांना हवा होता. दत्तात्रय बनसोडे हे केवळ सह्याजीराव असल्याने त्यांच्या विजयासाठी फिल्डिंग लावण्यात आल्याचा आरोप माने यांनी केला.

मानेंना रडू कोसळले
सर्वसामान्यांच्या न्यायासाठी मी 30 वर्षांपासून रस्त्यावरची लढाई लढतो आहे. पक्षाची प्रतिमा उंचावेल, असेच माझे काम आहे. मात्र, माझ्यावर सतत अन्याय करण्यात आला आहे. आता कोठे संधी होती. तीही हिसकावून घेण्यात आल्याचे सांगताना माने यांना रडू कोसळले.

...तर शिस्तभंगाची कारवाई
आ. अमित देशमुख यांच्यावर मोहन माने यांनी केलेल्या आरोपांची माहिती कळली. ते बिनबुडाचे आहेत. मी बाहेरगावी असून लातूरला आल्यानंतर याबाबत माहिती घेईन. आरोपांचे पुरावे सादर करण्यास व म्हणणे मांडण्यास मानेंना संधी दिली जाईल. आरोप सिद्ध न झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. - अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस