आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानापमान नाट्याने गाजली लातूर मनपाची सभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष समिती सदस्य निवडीच्या बैठकीत मानापमान नाट्य रंगल्याने मनपाच्या इतिहासातील ही दुसरीच सभा गाजली. विरोधकांनी एकजूट दाखवत सभागृह दणाणून सोडल्याने कामकाज जवळपास दीड तास पुढे ढकलावे लागले.
विशेष (विषय) समिती सदस्य निवडीसाठी सकाळी 10 वाजता ही सभा बोलवण्यात आली होती. अध्यक्षस्थानी महापौर प्रा. स्मिता खानापुरे तर मंचावर मनापाचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा, उपमहापौर सुरेश पवार यांची उपस्थिती होती. नगररचनाकार सतीश शिवणे यांनी विषय पत्रिकेचे वाचन सुरू केले. त्यावेळी उशिराने रिपाइंचे नगरसेवक चंद्रकांत चिकटे सभागृहात दाखल झाले. मात्र, त्यांच्या नियोजित आसनावर दुसराच सदस्य स्थानापन्न होते. त्यामुळे चिकटे यांनी बसण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती केली. त्या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक विक्रमसिंह चौहान यांनी जिथे आहे तिथे बसा, असे मध्येच हस्तक्षेप करत सांगितल्याने चिकटे भडकले. त्यांनी आपण दलित असल्याने आपला अपमान केला जात आहे, असा आरोप करत महापौरांसमोरील मोकळ्या जागेत ठिय्या मांडला.
मग त्यांना साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही तिथे ठिय्या मांडला. परिणामी एकच गोंधळ सुरू झाला. त्यानंतर मनपाचे प्राधिकृत अधिकारी डॉ. शर्मा यांनी पहिल्या सभेला जिथे जागा उपलब्ध करून देण्यात
आली होती तिथे बसावे, असा आदेश दिल्याने संतप्त
झालेले सदस्य शांत झाले. त्यानंतर दीड तासाने कामकाजाला सुरुवात झाली.
सभापतींच्या निवडी लवकरच
विशेष (विषय) समितीवरील सदस्यांच्या नावांची घोषणा शनिवारी करण्यात आली, परंतु कोणाला कोणत्या विषयाचे सभापती करायचे हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. मात्र या निवडी लवकरच होतील, असे महापौर खानापुरे यांनी सांगितले. बांधकाम, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण, शिक्षण व युवक कल्याण या चार समित्यांसाठी प्रत्येकी 11 सदस्य निवडण्यात आले आहेत. परिवहन समितीसाठी 13 सदस्य असून त्यावर स्थायी समितीचे सभापती पदसिद्ध सदस्य आहेत. या सर्व समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य घेण्यात आला आहे.

मंचावर तीनच खुर्च्या
हा गोंधळ शांत होत नाही तोच आणखी एक मानापमानाचा प्रकार घडला. मंचावर तीनच खुर्च्या होत्या अन् त्यावर पदाधिकारी विराजमान होते. त्या वेळी काँग्रेसचे नगरसेवक रविशंकर जाधव यांनी मंचावर स्थायी समितीचे सभापती अ‍ॅड. समद पटेल यांना बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. त्यानुसार पटेल हे मंचाच्या जवळही आले, परंतु प्राधिकृत अधिकारी डॉ. शर्मा यांनी अशा सभांना स्थायी समितीच्या सभापतींना मंचावर बसण्याची परवानगी नसते, असे सांगत त्यांना मंचावर बसू दिले नाही. त्यामुळे पटेल यांना परत जावे लागले.