आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्क्रिय असतो तर पाच मुलांचा बाप झालोच नसतो; लातूर महापौराचे उद्रृगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- महापालिकेच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारामुळे लातूरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी मंगळवारी सभागृह डोक्यावर घेतले. याचा राग अनावर झालेल्या महापौर अख्तर शेख यांनी थेट कमरेखालची भाषा सुरू केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मी पाच मुलांचा  बाप असून माझ्यावर आरोप करणाऱ्यांना चार वर्षांत मूलच झालेले नाही. मग मी निष्क्रिय कसा, असा सवाल त्यांनी केला. या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून फिरायला सुरुवात झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.   
लातूरजवळच्या नागझरी बंधाऱ्यात अडीच टीएमसी पाणी एकाच अवकाळी पावसाने जमा झाले होते. मात्र, महापौरांच्या निष्क्रियतेमुळे हे पाणी लातूरसाठी राखून ठेवता आले नाही. ते शेतकऱ्यांनी उपसले आणि नेत्यांचे साखर कारखाने सुरू राहतील याची तजवीज केली, असा आरोप करीत विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले.  दोन वेळा सभा तहकूब करावी लागली. त्यातच शिवसेनेच्या सुनीता चाळक यांनी महापौरांवर बाटली फेकून मारली. त्यामुळे महापौर अख्तर शेख चांगलेच चिडले होते. सायंकाळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना विरोधकांनी तुमच्यावर निष्क्रियतेचा आरोप केलाय, असा प्रश्न विचारला असता महापौरांचा तोल गेला. त्यांनी निष्क्रियता शब्दाचा संबंध थेट अपत्यांच्या संख्येशी जोडला. मला पाच मुले असून माझ्यावर निष्क्रियतेचा आरोप करणाऱ्यांना चार वर्षांत एकही मूल झाले नसल्याची टिप्पणी त्यांनी केली. निष्क्रियता शब्दाचा अर्थ काय याचा शोध घ्यावा लागेल, असेही अख्तर शेख म्हणाले.
 
सोशल मीडियावरून टीका  
महापौर अख्तर शेख यांचे हे वक्तव्य असलेला व्हिडिओ मंगळवारी रात्रीपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. दहा सेकंदांची ही क्लिप व्हॉट्सअॅपवरून फिरली. अनेकांनी ती फेसबुकवरही शेअर केली. लोकांनी महापौरांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. भयंकर, मूर्खपणा, हॉरिबल, अशा माणसांना महापौरसारखे पद कसे मिळते? अशा कॉमेंट टाकल्या.

काय म्हणाले महापौर
अभी ये निष्क्रिय कहते हैं, निष्क्रिय किसे कहते हैं मुझे नहीं मालूम. उसका अर्थ पूछना पडेंगा, मैं पाँच बच्चों का बाप हूं, उनको तो बच्चे चार साल से होरे नही, ऐसी हालत है.   

लातूरची प्रतिमा मलिन झाली  
लातूर शहराचे प्रथम नागरिक असा मान असलेल्या महापौरांनी ते  वक्तव्य करून लातूरची प्रतिमा मलिन केली आहे. त्यांना ज्या नेत्यांनी या पदावर बसवलंय त्यांनी काहीच अधिकार प्रदान केलेले नाहीत.  त्यामुळे मंगळवारच्या सभेत ते हतबल, अगतिक आणि तणावग्रस्त दिसत होते. शैलेश स्वामी, नगरसेवक, राष्ट्रवादी

मी रागात बोलून गेलो..उद्देश तो नव्हता..  
माझ्यावर शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी आरोप केला. पण त्याचा मला राग नाही. विरोधी नगरसेवक रवी सुडे, शैलेश स्वामी यांनीही निष्क्रियतेचे आरोप केले. ते मला २० वर्षांपासून ओळखतात. तरीही त्यांनी माझ्यावर निष्क्रिय असल्याची टीका केली, याचा मला राग आला. त्या भरात मी बोलून गेलो. माझा तो उद्देश कधीही नव्हता. मी मनात गोष्ट लपवून ठेवत नाही. याचा गैरअर्थ काढू नये. सोशल मीडियावर क्लिप फिरवू नये. मला पहाटे चार वाजता फोन केला तरी मी घेतो. मी काम करतोय. चुका झाल्या असतील. पण मी काहीच करीत नाही हे म्हणणे अन्यायकारक ठरेल.  - अख्तर शेख, महापौर
बातम्या आणखी आहेत...