आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटेगावकरांच्या कृत्याने लातूर पॅटर्नला काळिमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - दहावी, बारावीमध्ये सातत्यपूर्ण यशासाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर पॅटर्नचा दबदबा आजही कायम आहे. मात्र, पॅटर्नच्या नावाखाली शिक्षणाचे बाजारीकरण करणारा एक नवा वर्गही लातूरमध्ये उदयास आला आहे. सहजगत्या मिळणार्‍या पैशांतून गुन्हेगार पोसण्यापर्यंत कोचिंग क्लासेसची मजल गेली आहे. मोटेगावकर केमिस्ट्री कोचिंग क्लासेसमध्ये केंद्रीय सेवा शुल्क पथकावर झालेला हल्ला हे त्याचेच द्योतक असून पॅटर्नला काळिमा फासण्याचा प्रकार आहे.

लातूरला येणार्‍या चार प्रमुख मार्गांपैकी कोणत्याही रस्त्याने शहरात प्रवेश केला की दिसतात ते कोचिंग क्लासेसच्या मोठमोठय़ाला जाहिरातींचे फलक. काही क्लासचालक तर हातात पुस्तक घेऊन थेट वर्गात शिकवतानाचा फोटो जाहिरात फलकांवरून दाखवतात. थोडे बारकाईने पाहायला गेले की त्यामध्ये होस्टेल, मेस, पुस्तकांची दुकाने, नाष्टा सेंटर अशा पॅटर्नच्या उपव्यवसायांचेही फलक दिसायला लागतात. असा हा सगळा बाजार गल्लोगल्ली फुलला आहे. अशा क्लासेसची ना कुठे नोंद ना ते सुरू करायला कुणाची परवानगी. विशेष म्हणजे भांडवलही नाही.

मुलांना बसायला सतरंज्या आणि समोर एक बोर्ड. शुल्क थोडे जास्त असेल तर खडखड वाजणारे बाकडे आणि कुरकुरणारे फॅन. मात्र कोणत्याही परिस्थितीत मुलांना डॉक्टर-इंजिनिअर करायचं, आयआयटीला घालायचं असली स्वप्नं घेऊन येणारे पालक असल्या क्लासच्या आणि क्लासचालकांच्या जाहिरातीला बळी पडतात.

एका बॅचला सातशे विद्यार्थी
नवी एमआयडीसी सुरू झाल्यानंतर शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या एमआयडीसीतले उद्योग तिकडे स्थलांतरित झाले. रिकाम्या झालेल्या गोडाऊनचं काय करायचं, असा प्रश्न निर्माण होण्याअगोदरच शैक्षणिक उद्योग बहरले. सगळ्या गोडाऊनमध्ये कोचिंग क्लासेस सुरू झाले. एका बॅचला सातशे विद्यार्थी हा इथल्या क्लासेसचा विक्रम आहे. दिवसभरात चार ते पाच बॅचेस होतात. एका विषयाला सुमारे वीस हजार रुपये इतकी फीस आकारली जाते.

महाविद्यालयेही आघाडीवर
नामांकित महाविद्यालयांतही अनुदानित जागा भरल्या की विनाअनुदानित जागांसाठी पैशांचाच खेळ सुरू होतो. या वर्षी पन्नास हजार ते दोन लाख रुपये एवढे डोनेशन वसूल करण्यात आले. गल्लीबोळातील सुमार कॉलेजातही वीस-तीस हजार रुपये वसूल केले जात आहेत. पालकांनाही आपला मुलगा लातूरच्या नामांकित कॉलेजात शिकतो हे सांगायला भूषण वाटते. त्यामुळे ते पैसे मोजतात.

पैशातून गुन्हेगारी वाढली
कोचिंग क्लासमध्ये पूर्वी शिक्षक आढळायचे. मात्र, आता सर्रास गल्लीबोळातले टपोरी दिसून येतात. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना धमकावणे, त्यांचे पैसे काढून घेणे, सायकली चोरणे, मुलींची छेड काढणे असे प्रकार वाढले आहेत. त्यांची मुजोरी वाढल्यामुळे क्लासचालकांनीच आता आपले स्वत:चे गुंड पाळले आहेत. क्लासला याच्याकडून धोका आहे, असे वाटले की त्याच्यावर थेट हल्ला करण्याचे प्रकार घडले. केंद्रीय सेवा शुल्क पथकावर झालेला हल्ला हाही त्यातूनच घडला आहे.
अख्खे घर व्यवसायात
शिक्षणाचे बाजारीकरणच एवढे झाले आहे की क्लासचालकांचे अख्खे कुटुंबच या व्यवसायात उतरले आहे. नवरा क्लासेस घेतो, त्याची बायको मेस चालवते, त्याचा भाऊ होस्टेल चालवतो आणि मेहुणा चहा-नाष्टा सेंटर चालवतो अशी स्थिती आहे.