लातूर - लातूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठीची पहिल्या अडीच वर्षांची मुदत संपणार असून नवीन पदाधिका-यांची निवड १२ तारखेला होणार आहे. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या निवडीसाठीचा कार्यक्रम घोषित केला असून पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पांडुरंग पोले यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
पहिल्या महापौर म्हणून प्रा.स्मिता खानापुरे तर पहिले उपमहापौर म्हणून सुरेश पवार यांची अडीच वर्षांपूर्वी निवड झाली होती. उर्वरित अडीच वर्षांसाठीचे महापौरपद इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित आहे. काँग्रेस पक्षाकडे स्पष्ट बहुमत असलेल्या या महापालिकेत महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या पाचच्या पुढे आहे. त्यामध्ये माजी स्थायी समिती सभापती राम कोंबडे, सभापती दीपक सूळ, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांची नावे आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे दीपक सूळ आणि गोजमगुंडे यांच्यात तीव्र स्पर्धा असून दोघांपैकी कुणाचाही निवड झाली तर दुसरा नेत्यांवर नाराज होणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जेथून काँग्रेस पक्षाला आघाडी मिळेल त्या भागातील नेत्यांचांच भविष्यात पदांसाठी विचार होईल, असे वक्तव्य आमदार अमित देशमुख यांनी केले होते. या निकषात विक्रांत गोजमगुंडे बसतात. भाजप उमेदवाराला ७० हजार मते पडली असली तरी त्यांचे घर असलेल्या प्रभागाचे नगरसेवक असलेल्या विक्रांत गोजमगुंडे यांनी काँग्रेसला आघाडी मिळवून दिली. तर दीपक सूळ यांनी त्यांच्या प्रभागात भाजपची सभा होणार असताना त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून नेत्यावरची निष्ठा वेगळ्या प्रकारे दाखवून दिली होती. या दोघांतील स्पर्धा पाहता तिसराच एखादा चेहरा समोर येतो की काय याचीही जोरदार चर्चा आहे. याबाबतचा अंतिम निर्णय माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख घेणार आहेत.