आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latur Municipal Corporation News In Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर महापालिकेने घराला सील ठोकले अन् काढलेसुद्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लाखोंच्या थकबाकीदारांना मोकळे सोडून लातूर महापालिकेने गुरुवारी हजारात थकबाकी असलेल्यांच्या घराला सील ठोकण्याचा भीमपराक्रम केला. विशेष म्हणजे सील ठोकलेल्यांमध्ये औरंगाबादचे प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. अविनाश येळीकर यांच्या मातोश्रींच्या नावावर असलेल्या घराचाही समावेश होता. हे कळाल्यानंतर तासाभरातच त्यांच्या घराचे सील काढण्यात आले. त्यांची थकबाकी केवळ १३८२२ इतकी आहे. याबाबत आपल्याला कसलीही पूर्वकल्पना दिली नसल्याचे डॉ. येळीकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

लातूर महापालिका आपल्या कारभारामुळे कायम चर्चेत असते. गुरुवारी त्यात मालमत्ता कराच्या थकबाकीवरून सील ठोकल्याच्या प्रकरणाची भर पडली. आठ कोटी रुपयांची थकबाकी असल्यामुळे मनपाने गुरुवारी मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम हाती घेतली. त्यामध्ये ज्या भागातून वर्षानुवर्षे कराचा भरणा केला जात नाही त्याकडे दुर्लक्ष करून जे नियमित कर भरतात, मात्र काही कारणांमुळे त्याचा एका वर्षाचाच कर थकलाय अशांना लक्ष्य करण्यात आले. दुपारपर्यंत दोन घरे, दोन फ्लॅट आणि पाच दुकांनाना सील ठोकण्यात आले. उच्च मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या सरस्वती कॉलनी, साईधाम कॉलनी या भागातील घरे आणि फ्लॅटच्या मालमत्ता कराची वसुली करण्यात आली. त्यातच सरस्वती कॉलनीत असलेल्या लक्ष्मीबाई दौलत येळीकर यांच्या घराला १३ हजार ८२२ रुपयांच्या थकबाकीसाठी सील ठोकण्यात आले. इतर एक रो हॉऊस, दोन फ्लॅट आणि पाच दुकानांनाही सील ठोकण्यात आले.

मोफत शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर कर बुडवतील ?
डॉ. अविनाश येळीकर हे औरंगाबादमधील प्रथितयश प्लास्टिक सर्जन आहेत. त्यांचे सामाजिक योगदानही मोठे आहे. दरवर्षी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ते लातूरमध्ये येऊन मोफत शस्त्रक्रिया शिबिर घेतात. त्यामध्ये किमान २०० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येते.

प्रशासनाची धावपळ
डॉ. अविनाश येळीकर यांच्या कार्याची माहिती देऊन घडलेल्या प्रकाराबाबत आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की करवसुली मोहीम सुरू आहे, पण कुणाच्या घराला सील ठोकले याची माहिती नाही. तसे काही झाले असेल तर सील काढायला सांगतो. आयुक्तांच्या आदेशानंतर सील काढण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली. अखेर येळीकर यांच्या घराला ठोकलेले सील सायंकाळी मनपाच्याच अधिकार्‍यांनी काढले.