आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर मनपा : समस्यांकडे दुर्लक्ष अन् दार्जिलिंग सहलीचे वेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - रस्त्यावर पडलेले मोठमोठाले खड्डे, रस्त्यावरच साचलेले कचऱ्यांचे ढीग, अद्यापही सुरळीत न झालेला पाणीपुरवठा, एका आड एक बंद असलेले पथदिवे अशा नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करून लातूर महापालिकेचे सर्वपक्षीय नगरसेवक दार्जिलिंगच्या सहलीवर निघाले आहेत. त्यासाठी लातूरकरांनी भरलेल्या करातील ४५ लाख रुपये खर्च होणार आहेत.

लातूर शहराने यंदाच्या उन्हाळ्यात अभूतपूर्व पाणीटंचाई अनुभवली. रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला. गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा धरण भरल्यामुळे पाणीपुरवठ्याची हमी झाली. मात्र, धरण भरल्याला पंधरा दिवस उलटल्यानंतरही लातूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. दुसरीकडे रस्त्यावर कचऱ्यांचे ढीग साचले आहे. डेपोवर टाकण्यास जागा नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात कचरा उचलला जात नाही. पावसाळ्यामुळे अगोदरच निकृष्ट काम झालेल्या रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर लातूर महापालिकेचा कारभार पाहणाऱ्या सत्ताधारी नगरसेवक आणि नागरिकांचा आवाज म्हणून त्यांच्यावर वचक ठेवणाऱ्या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांवर मोठी जबाबदारी आहे. परंतु त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक दार्जिलिंगच्या दौऱ्यावर निघाले आहेत. तिथे एका खासगी संस्थेने स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज यावर दोन दिवसांची प्रशिक्षण कार्यक्रम ठेवला आहे. दोन दिवसांचा अभ्यास आणि त्याला जोडून सहल असा कार्यक्रम नगरसेवकांनी आखला आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने हा विषय स्थायी समितीच्या सभेत ठेवल्यानंतर त्याला मान्यता देत कोण-कोण नगरसेवक येणार? याविषयीची विचारणा केली असता बहुतांश नगरसेवकांनी होकार कळवला आहे.

४५ लाखांचा चुराडा
कार्यकाळ संपत आलेल्या ७० नगरसेवकांना मनपा खर्चाने दार्जिलिंगला जाणे परवडणारे नाही. शहरातील कामे खोळंबण्याबरोबरच शुल्क, जाण्या-येण्याचे भाडे किमान ४५ लाख रुपये त्यावर खर्च होणार आहेत. करदात्यांच्या पैशाचा हा चुराडा कशासाठी? असा सवाल सोशल मीडियातून विचारला जातोय.

उपयोग काय?
येत्या मार्चमध्ये मनपाचा कार्यकाळ संपणार आहे. फेब्रुवारीअखेर निवडणूक घोषित होऊ शकते, तर डिसेंबरमध्येच आचारसंहिता लागू होऊ शकते. या पार्श्वभूमीवर नगरसेवक अभ्यास करून आल्यानंतरही त्यांच्या ज्ञानाचा लातूर महापालिकेला फायदा होणे शक्य नाही.
सोशल मीडियावर टीका
लातूरकरांना समस्येच्या गर्तेत सोडून अभ्यास सहलीच्या नावावर फिरायला जाऊ पाहणाऱ्या नगरसेवकांवर टीका होत आहे.
बातम्या आणखी आहेत...